आयपीएल स्पर्धेतील भ्रष्टाचार व झारखंड क्रिकेट संघटना यांच्यातील घनिष्ठ संबंध लक्षात घेता या प्रकरणांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी बिहार क्रिकेट संघटनेचे प्रमुख आदित्य वर्मा यांनी केली आहे.
वर्मा यांनीच सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केल्यामुळे एन. श्रीनिवासन यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून दूर व्हावे लागले. वर्मा म्हणाले, ‘‘मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आयपीएल सट्टेबाजीबाबत सुंदर रामन हे विंदू दारासिंग यांच्याशी थेट संपर्कात होते. तसेच झारखंड संघटनेनेही सर्व आरोपींशी हातमिळवणी केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोलकाता नाइट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रांची येथे गेल्या वर्षी झालेल्या सामन्याच्या वेळी रामन यांनी विंदू यांना काही माहिती पुरवली होती, असा आरोप करण्यात आला आहे. या सामन्याच्या वेळी ज्या हॉटेलमध्ये हे खेळाडू उतरले होते, त्याच हॉटेलमध्ये सट्टेबाजांचे वास्तव्य होते. ही सर्व व्यवस्था अमिताभ चौधरी यांच्या नेतृत्वाखालील झारखंड क्रिकेट संघटनेने केली होती. यावरून झारखंडचे क्रिकेट संघटक व सट्टेबाजांचे थेट संबंध होते, हे लक्षात येते.’’
‘‘झारखंड संघटनेविरुद्ध उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. चौधरी यांच्याविरुद्धही गैरव्यवहाराचे आरोप असून केंद्रीय दक्षता आयोगामार्फतही त्यांची चौकशी सुरू आहे,’’ असेही वर्मा म्हणाले.