पेटीएम, बायजू, ड्रीम ११ या प्रायोजकांवरही बंदी घालण्याची मागणी

नवी दिल्ली : विवोने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) शीर्षक प्रायोजकत्वाच्या करारातून माघार घेतल्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळापुढे (बीसीसीआय) आणखी नवे संकट उभे ठाकले आहे. चिनी उत्पादनांवर निर्बंध घालण्याच्या मोहिमेंतर्गत ‘बीसीसीआय’ने पेटीएम, बायजू आणि ड्रीम ११ या चिनी कंपन्यांशी संबंध असणाऱ्या प्रायोजकांवरही बंदी घालावी, अशी मागणी स्वदेशी जागरण मंचाने केली आहे.

संयुक्त अरब अमिराती येथे १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान खेळल्या जाणाऱ्या ‘आयपीएल’च्या १३व्या हंगामासाठी नवा शीर्षक प्रायोजक शोधण्यात ‘बीसीसीआय’ सध्या मग्न आहे. परंतु विवोने माघार घेतली असली तरी ‘आयपीएल’मधील सहा संघांचे प्रायोजक असलेल्या पेटीएम, ड्रीम ११ आणि बायजू यांच्यात चिनी कंपन्यांची हिस्सेदारी असल्याने या प्रायोजकांवरही बंदी घालण्याच्या मागण्यांनी सध्या जोर धरला आहे. ‘आयपीएल’च्या सहा संघांचाही थेट चिनी प्रायोजकांशी संबंध आहे. त्यामुळे स्वदेशी जागरण मंचाने या प्रायोजकांवर बंदी घालण्यासाठी ‘बीसीसीआय’वर दडपण आणले आहे.

‘‘आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत भारतातील उद्योजकांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘बीसीसीआय’ने विवोसोबतचा करार रद्द केला असला तरी अद्यापही असे अनेक प्रायोजक आहेत, ज्यांचा चिनी कंपन्यांशी संबंध आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने लवकरच या प्रायोजकांवर बंदी घालावी अथवा त्यांचे चिनी कंपन्यांशी असलेले संबंध तोडावे,’’ असे जागरण मंचाचे वरिष्ठ पदाधिकारी धनंजय भिडे यांनी सांगितले. स्वदेशी जागरण मंचातर्फे रविवारपासून ‘चीन छोडो’ अभियानास प्रारंभ करण्यात आला.

* ड्रीम ११ या प्रायोजकांत टँसेट या चिनी कंपनीची २० टक्के हिस्सेदारी आहे.

* भारतीय संघाच्या गणवेशाचे प्रायोजक असलेल्या बायजूमध्ये टँसेटची १५ टक्के  हिस्सेदारी आहे.

* देशांतर्गत क्रि के ट स्पर्धाचे प्रायोजक पेटीएममध्ये चीनच्या कंपनीची सर्वाधिक ५५ टक्के हिस्सेदारी आहे.

भारताने संधी गमावू नये!

२०२१चा ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि २०२३ची एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात आयोजित करण्यात येणार असल्याने भारताने विजेतेपद मिळवण्याची संधी गमावू नये, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी २०२१चा ट्वेन्टी-२० विश्वचषक भारतातच खेळवण्यात येईल, असे जाहीर केले. त्याविषयी गांगुली म्हणाला, ‘‘२०२१चा विश्वचषक भारतातच खेळवण्यात येईल, याची खात्री होती. सध्याच्या करोनाजन्य परिस्थितीकडे दुर्लक्ष करून सकारात्मक विचार केल्यास भारताला पुढील तीन वर्षांतील दोन विश्वचषक मायदेशात खेळायचे आहेत. त्यामुळे विश्वविजेतेपद मिळवण्याची यापेक्षा अधिक चांगली संधी त्यांना मिळणार नाही.’’