डॉ. प्रकाश परांजपे
आज डावातील एकच – पश्चिमेचा – हात दिला आहे. उत्तरेने डाव वाटून १ किलवर बोलीने खातं खोललं आणि १२-१४ चित्रगुण दाखविले. दक्षिणेने १ बिहू बोली देऊन १२+ चित्रगुण आणि समतोल हात दाखवला. त्यावर उत्तर २ बिहू बोलला. दक्षिणेच्या ३ बिहू बोलीवर सगळ्यांनी पास म्हटल्यावर बोलीसत्राची सांगता झाली. दक्षिणेच्या ३ बिनहुकुमीच्या ठेक्याविरुद्ध पश्चिमेने पहिली उतारी कुठल्या पानाची करावी?
ठेका बिनहुकुमीचा आहे. या प्रकारच्या डावात मोठी पानं पडून गेल्यानंतर उरलेल्या हलक्या पानांना स्वस्तात दस्त मिळू शकतात, कारण हुकुमाने मारलं जाण्याची भीती नसते. यामुळे ज्या पंथात आपल्याकडे जास्ती पानं आहेत, त्या पंथाच्या पानाची उतारी करणं भल्याचं ठरतं. पहिल्या एक दोन फेऱ्यात प्रतिस्पध्र्यांकडे असलेल्या त्या पंथाच्या मोठय़ा पानांना दस्त देऊन दूर करता आलं तर मग आपल्याकडील छोटय़ा पानांचा रस्ता मोकळा होण्याची शक्यता असते. यामुळे जर आपल्याकडे एखादा पंथ ४-५ पानी असेल आणि प्रतिस्पध्र्यांनी बोली सत्रामध्ये त्याचा उल्लेख केलेला नसेल तर बिनहुकुमी ठेक्याविरुद्ध अशा पंथाच्या पानाची उतारी करणं भल्याचं. वरील चित्रात पश्चिमेकडे ५ पानी इस्पिक आहे. त्यामुळे इस्पिकची उतारी करणं उत्तम.
पंथ ठरल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे योग्य ते पान निवडणं. या बाबतीत लक्षात ठेवायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रिजमधील प्रत्येक पान, मग ते कितीही छोटं का असेना, एखादा सांगावा घेऊन येतं, अर्थपूर्ण असतं. जेव्हा बिनहुकुमी ठेक्याच्या विरुद्ध लांबलचक पंथातून खेळायच्या पानाची निवड करायची असते, तेव्हा बरेचसे खेळाडू मोठेपणाच्या क्रमात चौथ्या पानाची निवड करतात. वरील चित्रात पश्चिमेकडे इस्पिकमध्ये एक्का, राणी, ९,५, ३ अशी पाच पानं आहेत, त्यात पंजी चौथ्या क्रमांकाची आहे, म्हणून इस्पिक पंजाची उतारी ही योग्य उतारी!
डावात भिडूकडे इस्पिक राजा दोन किंवा तीन पानी असेल तर पहिला दस्त राजाने जिंकून तो इस्पिकचं आक्रमण चालू ठेवेल आणि प-पू जोडीचे पहिले पाच दस्त होऊन ठेका मूळपदालाच बुडेल. जर भिडूकडे इस्पिक गुलाम असेल तर विरुद्ध पक्षाचा राजा पहिला दस्त जिंकू शकेल. पण नंतर जर उतारी प-पू जोडीकडे दुसऱ्या कुठल्याही पंथातील दस्त जिंकून आली तर इस्पिकचे चार दस्त वाजवून घेण्यासाठी सज्ज असतील आणि ठेका बुडेल. इस्पिक राजा गुलाम दोन्ही दक्षिणेकडे असतील तर पहिला दस्त उ-द जोडीचा स्वस्तात होईल, पण पुढे पूर्व एखादा दस्त जिंकला तर तो इस्पिक खेळू शकेल आणि दक्षिणेचा राजा बगलेंत घेऊन प-पू जोडीला इस्पिकचे ४ दस्त मिळू शकतील. जर इस्पिक गुलाम दक्षिणेकडे, आणि राजा उत्तरेकडे असला तर मात्र प-पू जोडीला सहजासहजी इस्पिकचे दस्त मिळणार नाहीत. पण मग दुसऱ्या पंथांत दस्त मिळण्याची शक्यता तरी किती असेल या डावात? चित्रातला पश्चिमेचा डाव बघून तुमच्या हे सहज लक्षात येईल की इतर पंथात दस्त जिंकण्याचं काम जास्त कठीण आहे. म्हणूनच सर्वात लांब पंथातल्या चौथ्या पानाची उतारी ही बिनहुकुमी ठेक्याच्या विरुद्ध भल्याची उतारी असं म्हटलं जातं!
http://www.demicoma.com
panja@demicoma.com
(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)