भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी दोनही संघ कसून सराव करत आहेत. भारतीय संघ सध्या एसेक्स य संघाविरुद्ध सराव सामना खेळत आहे. या दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने भारतीय संघाच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

एखाद्या सामन्याबद्दल किंवा मालिकेबद्दल अंदाज व्यक्त करणं मला पसंत नाही. पण भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी मालिकेत मला एका संघाची बाजू घेण्यास सांगितले तर मी इंग्लंडची बाजू घेईन, असे स्पष्ट मत स्टेनने व्यक्त केले आहे. स्टेन मुंबईत एका कार्यक्रमानिमित्त आला होता. त्यावेळी त्याला भारत-इंग्लंडदरम्यानच्या मालिकेबाबत प्रश्न विचारण्यात आले.

पाच कसोटी सामने हे कोणत्याही संघासाठी फायदेशीर असतात. पण ही मालिका दोन्ही संघांसाठी आव्हान असणार आहे. अशा परिस्थितीत जर एका संघावर पैसे लावायचे असतील, तर मी निश्चितच इंग्लंडच्या संघावर पैज लावेन. कारण भारताच्या तुलनेत इंग्लंडचे गोलंदाज अधिक प्रतिभावान आहेत आणि हाच फरक या मालिकेत सर्वाधिक महत्वाचा ठरेल, असेही तो म्हणाला.

‘भारताला आपल्या फिरकी गोलंदाजांवर विश्वास आहे. वन-डेमध्ये भारताच्या फिरकी गोलंदाजांनी कमाल दाखवली आहे. पण कसोटी मालिकेल इंग्लंडच्या सपाट खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांना फारशी मदत मिळणार नाही, असा अंदाजही स्टेनने व्यक्त केला.