वेस्ट इंडिजविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने चांगली सुरूवात केली. पहिल्या दिवशी संतुलित असलेला सामना दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या दिशेने झुकला. इंग्लंडचा पहिला डाव ३६९ धावांवर आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजची अवस्था १३६ धावांत ६ गडी अशी झाली. अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ अर्धा तास लवकर बंद करावा लागला.

दुसऱ्या दिवसाच्या खेळात एक अतिशय मजेशीर अशी गोष्ट घडली. बेन स्टोक्स आणि कर्णधार जो रूट हे दोघे स्लिपमध्ये फिल्डिंग करत होते. त्यावेळी रूटला अचानक स्टोक्सच्या पॅन्टवर एक चॉकलेटी (तपकिरी) रंगाचा डाक दिसला. त्याने ती गोष्ट स्टोक्सच्या निदर्शनास आणून दिली. स्टोक्सने तो डाग लपवण्याचे निष्फळ प्रयत्न केले, पण त्याला ते शक्य झालं नाही. हा सारा प्रकार पाहून भर मैदानात रूटला हसू अनावर झालं.

पाहा मजेशीर व्हिडीओ-

स्टोक्सच्या पॅन्टवर चॉकलेटी रंगाचा डाग कसा काय पडला असेल याचे साऱ्यांनी फार मजेशीर अंदाज बांधले. त्यापैकी एका ट्विटवर स्टोक्सने रिप्लाय करत सांगितलं की तो चुकून सांडलेल्या कॉफीवर बसल्याने तो डाग पडला होता.

दरम्यान, इंग्लंडच्या ३६९ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. क्रेग ब्रेथवेट १ धाव काढून बाद झाला. कॅम्पबेल आणि होप यांनी छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण कॅम्पबेल ३२ तर होप १७ धावांवर माघारी परतले. ब्रुक्स आणि चेसदेखील एकेरी धावसंख्येवर बाद झाले. ब्लॅकवूडने बाद झाल्यावर अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबेपर्यंत कर्णधार जेसन होल्डर आणि डावरिच यांनी खेळपट्टीवर तग धरला.