करोनानंतर चार महिन्यांनी झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडला पराभवाचा सामना करावा. पण बुधवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध चांगली सुरूवात केली. इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने दुसऱ्या कसोटीसाठी संघात पुनरागमन केले. त्यासोबतच इंग्लंडने संघात अनुभवाला प्राधान्य देत स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स आणि सॅम करन यांचा संघात समावेश करून घेतला. रूटच्या नेतत्वाखालील इंग्लंडच्या संघाने पहिल्या दिवसअखेर ३ गड्यांच्या मोबदल्यात २०७ धावांपर्यंत मजल मारली. रॉस्टन चेसने दोन चेंडूंवर दोन गडी माघारी धाडले, पण अल्झारी जोसेफने जो रूटला झेलबाद केल्याचा क्षण विशेष भाव खाऊन गेला.

पहिल्या सत्रात इंग्लंडने अतिशय सावध फलंदाजी केली. पण खेळपट्टी ओली असल्याने वेगवान गोलंदाजांना फारशी मदत मिळत नव्हती. कर्णधार होल्डरने फिरकीपटू रॉस्टन चेसला गोलंदाजी दिली आणि त्याने दोन चेंडूत दोन गडी बाद केले. सलामीवीर रॉरी बर्न्स (१५) आणि झॅक क्रॉली (०) हे लागोपाठ दोन चेंडूंवर माघारी परतले. चेसची हॅटट्रीक कर्णधार जो रुटने हुकवली. पण कर्णधार जो रुट खेळपट्टीवर स्थिरावतोय असं वाटताच अल्झारी जोसेफने अप्रतिम स्विंग गोलंदाजी करत त्याला बाद केलं.

जोसेफने अतिशय वेगवान गोलंदाजी करत चेंडू आऊटस्विंग केला. रूट चेंडू टोलवणार इतक्यात चेंडू स्विंग होऊन बॅटच्या कडेला लागला. चेंडू त्याच वेगाने दुसऱ्या स्लिपमध्ये असलेल्या होल्डरच्या दिशेने पण थोडासा बाहेर गेला. होल्डरने वाऱ्याच्या वेगाने येणारा चेंडू कोणतीही चूक न करता झेलला आणि प्रतिस्पर्धी कर्णधाराला २३ धावांवर माघारी धाडलं.

झटपट गडी बाद होत असल्याने इंग्लंडची अवस्था ३ बाद ८१ अशी झाली होती. त्यानंतर सलामीवीर डॉम सिबली ( (नाबाद ८६) आणि बेन स्टोक्स (नाबाद ५९) यांनी विंडीजचा डाव सावरला. शतकी भागीदारी करत त्यांनी इंग्लंडला दिवसअखेर द्विशतक गाठून दिले. दोघांनीही आपली अर्धशतकेदेखील पूर्ण केली. याच खेळात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने चेसच्या गोलंदाजीवर पुढे येऊन षटकार लगावला. स्टोक्सने लगावलेला षटकार हा सामन्यातील पहिला षटकार ठरला.