News Flash

ENG vs IND 4th Test : विराटची रणनिती यशस्वी, पहिल्या दिवसअखेर जो रूट माघारी

पहिल्या डावात इंग्लंडच्या १७ षटकात ३ बाद ५३ धावा

England vs India fourth test day one match report
भारत-इंग्लंड कसोटी मालिका

केनिंग्टनच्या ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात ३ बाद ५३ धावा केल्या आहेत. मालिकेत दमदार फॉर्मात असलेला इंग्लंडचा कर्णधार जो रूट मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ख्रिस वोक्स, ओली रॉबिन्सन यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारताला ६१.३ षटकात १९१ धावांत गारद केले. सामन्यात संधी मिळालेल्या मुंबईकर शार्दुल ठाकूरचे झटपट अर्धशतक टीम इंडियाला दोनशे धावांच्या जवळ घेऊन गेले. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी योगदान दिले. दुखापतीतून सावरलेल्या ख्रिस वोक्सने ४ बळी घेत आपले पुनरागमन यशस्वी केले आहे. पाच सामन्यांची ही मालिका सध्या १-१ने बरोबरीत आहे.

इंग्लंडचा डाव

भारतासारखीच इंग्लंडची सुरुवात खराब झाली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रोरी बर्न्स आणि हसीब हमीद या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर फॉर्मात असलेल्या जो रूटने डेव्हिड मलानसोबत संघाचे अर्धशतक पूर्ण केले. वेगवान गोलंदाज उमेश यादवने सुरेख चेंडूवर रूटची दांडी गुल केली, रूटला २१ धावा करता आल्या. दिवसअखेर डेव्हिड मलान २६ तर नाईट वॉचमेन क्रेग ओव्हर्टन एका धावेवर नाबाद आहे.

 

भारताचा पहिला डाव

पहिल्या डावात भारताने लीड्समधील कसोटीचा कित्ता गिरवायला सुरुवात केली.  २० षटकात भारताने अवघ्या ३९ धावांत लोकेश राहुल (१७), रोहित शर्मा (११) आणि चेतेश्वर पुजाराला (४) गमावले.  दुखापतीतून सावरलेला वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने रोहितला बाद केले. ओली रॉबिन्सनने राहुलला पायचित पकडले, तर जेम्स अँडरसनने पुजाराला यष्टीपाठी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. पुजारानंतर भारताने रवींद्र जडेजाला फलंदाजीसाठी बढती दिली. मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला. वोक्सने जडेजाला १० धावांवर बाद केले. लंचनंतर विराटने आपले अर्धशतक फलकावर लावले. चांगल्या लयीत दिसणारा विराट रॉबिन्सनचा बळी ठरला. रॉबिन्सनने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. विराटने ८ चौकारांसह ५० धावांची खेळी केली. जडेजा-विराटनंतर अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंतच्या जोडीकडून संघाला सावरण्यासाठी मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र दोघेही पुन्हा एकदा अपयशी ठरले. आज संधी मिळालेल्या शार्दुल ठाकूरने उमेश यादवला सोबत घेत ३१ चेंडूत तुफानी अर्धशतक ठोकले. शिवाय दोघांनी अर्धशतकी भागीदारीही फलकावकर लावली.  ख्रिस वोक्सने शार्दुलला पायचित पकडले, शार्दुलने ३७ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकारांसह ५७ धावा चोपल्या. शार्दुलनंतर इंग्लंडने भारताचा लवकर गाशा गुंडाळला. इंग्लंडकडून वोक्सने चार, ऱॉबिन्सनने तीन बळी घेतले.

दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन पुन्हा एकदा भारतीय संघात जागा मिळवण्यात अपयशी ठरला आहे. भारताने इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्याबदली उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांना संधी दिली आहे. दुसरीकडे इंग्लंडने सॅम करनऐवजी वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सला संघात घेतले आहे. तर पितृत्वाच्या रजेमुळे या कसोटीत न खेळणाऱ्या जोस बटलरऐवजी ओली पोप संघात आला आहे.

 

ओव्हलमध्ये भारताची कामगिरी

ओव्हलमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. संघाला १३ पैकी फक्त एक कसोटी जिंकता आली आहे. ५० वर्षांपूर्वी  भारताला या मैदानावर शेवटचा विजय मिळाला होता. त्यामुळे भारताला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी आहे. पण येथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. सामन्यात सर्वाधिक दबाव टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर असेल. तो स्वतः फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकलेला नाही. दुसरीकडे, शेवटच्या कसोटीत भारताला एका डावाने पराभव पत्करावा लागला आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत : रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड : रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), ओली पोप, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, क्रेग ओव्हर्टन, ओली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2021 3:02 pm

Web Title: england vs india fourth test day one match report adn 96
Next Stories
1 Ind vs Eng: ओव्हल कसोटीपूर्वी विराट कोहली म्हणाला, “सर्वच टीम…”
2 CPL 2021: पंचांनी वाइड न दिल्याने पोलार्ड नाराज; केलं असं की…!
3 IND vs ENG: कोहलीविरुद्धच्या खास सेलिब्रेशनचा अर्थ काय?; जेम्स अँडरसनने केला खुलासा
Just Now!
X