भारत-इंग्लंड कसोटी मालिका
महान अष्टपैलू कपिलदेव यांच्या १३१ कसोटींचा विक्रम मोडण्याचा अद्याप विचारही केला नसून सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला पोहोचविण्याचे एकमेव ध्येय माझ्यासमोर आहे, अशी प्रतिक्रिया अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने व्यक्त केली.
मोटेरा येथील सरदार पटेल स्टेडियमवर भारत-इंग्लंड यांच्यातील गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या प्रकाशझोतातील तिसऱ्या कसोटीला बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. इशांतच्या कारकीर्दीतील हा १००वा कसोटी सामना असणार आहे. कपिल यांच्यानंतर १०० कसोटी खेळणारा इशांत हा भारताचा दुसराच वेगवान गोलंदाज ठरणार आहे. त्याशिवाय कपिल यांच्या १३१ कसोटींचा विक्रम मोडण्याचीही संधी इशांतला आहे. याविषयी इशांत म्हणाला, ‘‘कपिल यांच्या विक्रमाविषयी मी अद्याप विचारही केलेला नाही. भारतासाठी १००वी कसोटी खेळण्याची संधी मिळणे, हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. सध्या मी ३२ वर्षांचा असून एकाच प्रकारात भारतासाठी खेळत असल्याने तंदुरुस्ती टिकवण्याबरोबरच जोपर्यंत स्वत:चे १०० टक्के योगदान देऊ शकेन, तोपर्यंत निवृत्तीचाही विचार करणार नाही.’’
‘‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका फार महत्त्वपूर्ण असल्याने मी सध्या भारताला कशाप्रकारे जिंकवता येईल, याचाच विचार करत आहे. कारकीर्दीत मी एकदाही विश्वचषक खेळलो नाही. त्यामुळे आम्ही जर जागतिक स्पर्धा जिंकली, तर अन्य खेळाडू ज्याप्रमाणे विश्वचषक विजयाचा जल्लोष करतात त्याचप्रमाणे मीसुद्धा या जेतेपदाचा आनंद साजरा करेन,’’ असेही इशांतने सांगितले.
मोटेराची खेळपट्टी फसवी -अँडरसन
मोटेराच्या खेळपट्टीवर गवताचा थर दिसत असला तरी प्रत्यक्षात सामन्याच्या दिवशी ही खेळपट्टी फिरकीपटूंनाच लाभदायक ठरेल, असे मत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने व्यक्त केले. दोन दिवसांपूर्वीच इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने मोटेराच्या हिरव्यागार खेळपट्टीची चित्रफीत ‘ट्विटर’वर पोस्ट करून येथे गोलंदाजी करण्यासाठी आपले हात शिवशिवत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ‘‘मोटेराची खेळपट्टी एखाद्या वेगवान गोलंदाजाला मोहात पाडू शकते. परंतु चेपॉक आणि येथील खेळपट्टीत काहीच फरक नसेल, असे मला वाटते. सध्या तरी या खेळपट्टीवर पुरेशा प्रमाणात गवत दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात सामन्याच्या दिवशी संपूर्ण गवत नाहीसे करून फिरकीपटूंनाच फायदेशीर खेळपट्टी बनवण्यात येईल,’’ असे अँडरसन म्हणाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 12:12 am