News Flash

IND vs SL : श्रीलंकेसाठी शेवट ठरला ‘गोड’..! टीम इंडियानं जिंकली वनडे मालिका

शेवटच्या वनडे सामन्यात लंकेने भारताला ३ गड्यांनी हरवले.

india vs  sri lanka third one day match result
भारताने जिंकली वनडे मालिका

तब्बल सहा बदल केलेल्या टीम इंडियाला श्रीलंकेने तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत ३ गड्यांनी पराभवाचे पाणी पाजले आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला, पण टीम इंडियाला पूर्ण षटकेही खेळता आली नाहीत. घाऊक बदल केलेली टीम इंडिया ४३.१ षटकात २२५ धावांवर आटोपली. लंकेकडून अकिला धनंजया आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद करत टीम इंडियाच्या डावाला सुरूंग लावला. प्रत्युत्तरात लंकेकडून सलामीवीर अविष्का फर्नांडो, नवखा भानुका राजपक्षा यांनी झुंजार खेळी करत सामना जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. या दोघांनी अर्धशतकी खेळी करत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. टीम इंडियाने ही वनडे मालिका २-१ अशी खिशात टाकली आहे. अविष्काला सामनावीर तर मुंबईकर सूर्यकुमार यादवला मालिकावीर पुरस्कार मिळाला.

श्रीलंकेचा डाव

भारताच्या २२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी सलामीवीर मिनोद भानुकाला वैयक्तिक अवघ्या ७ धावांवर गमावले. पदार्पणवीर अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौथमने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अविष्का फर्नांडो आणि काही दिवसांपूर्वी वनडे पदार्पण केलेला भानुका राजपक्षा यांनी डावाचा मोर्चा सांभाळला. या दोघांनी शतकी भागीदारी केली. दरम्यान भानुकाने अर्धशतक पूर्ण केले. राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने राजपक्षाला बाद केले. राजपक्षाने १२ चौकारांची आतषबाजी करत ६५ धावा कुटल्या.

त्यानंतर अविष्का फर्नांडोने संघाला विजयी रेषेपर्यंत आणून ठेवले. फर्नांडोने ४ चौकार आणि एका षटकारासह ७६ धावांची खेळी केली. एका बाजूने कर्णधार दासुन शनाका, धनंजया डि सिल्वा, चमिका करुणारत्ने आणि चरिथ असालांका यांनी साथ सोडल्यामुळे रंगत निर्माण झाली खरी, पण तोपर्यंत उशीर झाला होता. ३९ षटकात लंकेने सात गडी गमावत हे लक्ष्य गाठले. भारताकडून राहुल चहरने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर चेतन साकारियाला २ बळी मिळाले.

 

भारताचा डाव

पहिल्या वनडेत तुफान फटकेबाजीने सुरुवात करणाऱ्या पृथ्वी शॉने या सामन्यातही चांगली सलामी दिली. त्याचे अर्धशतक एका धावेने हुकले. शॉने आपल्या खेळीत ८ चौकार ठोकले. दुसऱ्या बाजुला मात्र कर्णधार शिखर धवन (१३) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. शॉला श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने पायचित पकडले, तर धवन चमीराच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. आज वनडे पदार्पण केलेल्या संजू सॅमसनने दमदार फलंदाजी करत आपली पात्रता सिद्ध केली. संजूने ५ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावा ठोकल्या. २३ षटकात टीम इंडियाने ३ फलदाजांना गमावत १४७ धावा केल्या असताना पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळवण्यात येईले हे शिक्कामोर्तब झाले.

हेही वाचा – IND vs SL : मॅच सुरू होण्यापूर्वीच भारताच्या कर्णधारानं केलं सेलिब्रेशन..पाहा व्हिडिओ

खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजीला उतरती कळा लागली. श्रीलंकेकडून आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या अकिला धनंजया आणि प्रवीण जयविक्रमा यांनी धारदार गोलंदाजी केली. चांगल्या लयीत खेळणारा सूर्यकुमार यादव ४० धावा करून बाद झाला. तर हार्दिक पंड्या, पदार्पणवीर नितीश राणा आणि कृष्णप्पा गौतम चांगल्या धावा काढण्यात अपयशी ठरले. श्रीलंकेकडून अकिला धनंजयाने ४४ धावांत ४ तर जयविक्रमाने ५९ धावांत ३ बळी घेतले. दुश्मंता चमीराला २ बळी घेता आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 11:37 pm

Web Title: india vs sri lanka third one day match result adn 96
Next Stories
1 TOKYO 2020 : चक दे इंडिया..! मेरी कोम आणि मनप्रीतनं केलं भारतीय पथकाचं नेतृत्व
2 IND vs SL 3rd ODI : ‘घाऊक’ बदल केलेली टीम इंडिया ढेपाळली, श्रीलंकेला २२६ धावांचे आव्हान
3 IND vs SL : मॅच सुरू होण्यापूर्वीच भारताच्या कर्णधारानं केलं सेलिब्रेशन..पाहा व्हिडिओ
Just Now!
X