कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरु असलेल्या मैदानावर चेन्नईविरुद्ध कोलकाताने ८ बाद १६१ धावा केल्या. ख्रिस लिनच्या ८२ धावांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर कोलकाताने चेन्नईला विजयासाठी १६२ धावांचे आव्हान दिले.
चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि कोलकाताला फलंदाजीस आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना संघात पुनरागमन केलेल्या सुनील नरिनला फलंदाजीत फार मोठी कामगिरी करता आली नाही. तो झेलबाद झाला आणि कोलकाताला पहिला धक्का बसला. त्याने केवळ २ धावा केल्या. पुनरागमनात नरिन अपयशी ठरला असला, तरी ख्रिस लिनने आपली छाप पाडली. त्याने ३६ चेंडूत दमदार अर्धशतक साजरे केले. शांत आणि संयमी खेळीने सुरुवात करणारा नितीश राणा उंच फटका मारून झेलबाद झाला. त्याने १८ चेंडूत २१ धावा केल्या.
त्यानंतर मैदानावर आलेल्या अनुभवी रॉबिन उथप्पाकडून कोलकाताला खूप अपेक्षा होत्या. पण पहिल्याच चेंडूवर त्याने अत्यंत बेजबाबदार फटका खेळला. इम्रान ताहिरच्या फिरकीवर पहिल्याच चेंडूवर षटकार खेचण्याचा मोह त्याला झाला, पण त्याने खेळलेला मोठा फटका फारसा प्रभावी ठरला नाही. चेंडू उंच हवेत उडाला आणि डु प्लेसिसने अफलातून पद्धतीने त्याचा झेल टिपला. त्यामुळे उथप्पाला शून्यावर माघारी परतावे लागले.
पहा व्हिडीओ –
WATCH: That ‘Faf’ulous catch by du Plessis! @faf1307 @ChennaiIPL
: https://t.co/5oq8VslM6T
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2019
उथप्पा बाद झाल्यावर दमदार फटकेबाजी करणारा सलामीवीर ख्रिस लिन ८२ धावांवर बाद झाला. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने ५१ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकार खेचत ८२ धावा केल्या. धोकादायक फटकेबाजी करणारा आंद्रे रसल या सामन्यात स्वस्तात बाद झाला. १ चौकार आणि १ षटकार खेचत त्याने फटकेबाजीला सुरुवात केली होती. पण त्याला फार काळ खेळपट्टीवर तग धरता आले नाही. तो ४ चेंडूत १० धावा करून माघारी परतला. कर्णधार दिनेश कार्तिककडून जबाबदारीने खेळी करण्याची अपेक्षा चाहत्यांना होती, पण त्याने बेजबाबदार फटका लगावला आणि कोलकाताला सहावा धक्का बसला. त्याने १४ चेंडूत १८ धावा केल्या. शुभमन गिलला फार धावा जमवता आल्या नाहीत, त्यामुळे कोलकाताला १६१ धावांवर समाधान मानावे लागले.