आठ संघांसाठी वेगवेगळे हॉटेल्स, संयुक्त अरब अमिरातीकडे प्रस्थान करण्यापूर्वी दोन नकारात्मक कोविड चाचण्या आणि जैव-सुरक्षा नियमाचा भंग केल्यास शिक्षा अशा मुद्दय़ांचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी संघांकडे सुपूर्द केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीत समावेश आहे.

‘आयपीएल’ पदाधिकारी आणि संघमालक यांच्यात बुधवारी झालेल्या बैठकीत विलगीकरणासह काही मुद्दय़ांवर गांभीर्याने  झाली. प्रत्येक संघाच्या वैद्यकीय चमूकडे १ मार्चपासूनची खेळाडू आणि साहाय्यकांची वैद्यकीय माहिती उपलब्ध असेल. त्यामुळे अमिरातीत करोनाचा प्रसार रोखता येईल आणि स्पर्धा उत्तम वातावरणात पार पडेल, असे ‘बीसीसआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

‘आयपीएल’ आचारसंहितेनुसार कोणत्याही खेळाडू किंवा साहाय्यक मार्गदर्शकाने जैव-सुरक्षा नियमाचा भंग केल्यास त्याला शिक्षा देण्यात येईल. कोणत्याही व्यक्तीची करोना चाचणी सकारात्मक आल्यास त्याला विलगीकरण स्वीकारावे लागेल. त्यानंतर १४ दिवसांनी २४ तासांच्या अंतरात त्याच्या दोन करोना चाचण्या होतील. या दोन्ही चाचण्यांचे अहवाल नकारात्मक येणे आवश्यक आहे.

सहाऐवजी तीन दिवसांचे विलगीकरण हवे!

*  संयुक्त अरब अमिरातीमध्ये दाखल झाल्यानंतर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) क्रिकेटपटूंसाठी सहा दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी असावा, असे प्रमाणित कार्यपद्धतीमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र सहाऐवजी तीन दिवसांचे विलगीकरण करावे, अशी मागणी ‘आयपीएल’मधील संघांनी केली आहे.

*   ‘बीसीसीआय’च्या कार्यपद्धतीनुसार अमिरातीमधील विलगीकरणादरम्यान पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी चाचणी घेण्यात यावी. या चाचण्या सकारात्मक आल्या तरच क्रिकेटपटूला ‘आयपीएल’मध्ये खेळता येईल, असे म्हटले आहे. त्यानंतर ५३ दिवसांच्या स्पर्धेदरम्यान प्रत्येक पाचव्या दिवशी खेळाडूला चाचणीला सामोरे जावे लागेल.

*  सर्व संघ स्वतंत्र हॉटेल्समध्ये निवासास असतील. त्यामुळे खेळाडूंना पूर्वसूचना देऊन कौटुंबिक भोजन करता यावे किंवा गोल्फ खेळता यावा, अशी परवानगी संघांनी मागितली आहे. खेळाडू ८०हून अधिक दिवस जैव-सुरक्षित वातावरणात असतील. त्यामुळे ही स्पर्धात्मक जपणे सोपे नसेल, असे संघमालकांचे म्हणणे आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेद्वारे आम्हाला जैव-सुरक्षेच्या वातावरणाचे महत्त्व पटले आहे. परंतु विशिष्ट हॉटेल किंवा पूर्वसूचना देऊन एखाद्या ठिकाणी जाता यावे, यासाठी संघांना परवानगी हवी आहे. हॉटेलमधून संपर्कविरहित खाद्यपदार्थ मागवता येतील का, अशी विचारणाही संघांनी केली आहे.