जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात विजयवीराचे योगदान देण्यासाठी उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने व्यक्त केली.

इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बूमरा यांच्यासह ४८ कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या उमेशला भारताच्या सर्वोत्तम वेगवान माऱ्यात स्थान दिले जाते. गेल्या तीन वर्षांत दिमाखदार कामगिरी बजावूनही उमेशचा अंतिम ११ जणांमध्ये समावेश केला जात नाही. कारण मोहम्मद सिराजसारखे अनेक युवा गोलंदाज आता लक्षवेधी कामगिरी करीत आहेत.

‘‘जागतिक अजिंक्यपदाचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार असून, स्विंग आणि वेग तिथे महत्त्वाचा असेल. या सामन्यात अंतिम ११ जणांमध्ये खेळण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ असे उमेश म्हणाला.

‘‘मी आता ३३ वर्षांचा असून, पुढील दोन-तीन वर्षे खेळेन अशी आशा आहे. काही युवा खेळाडू आता उत्तम कामगिरीनिशी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत,’’ असे उमेशने सांगितले.

‘‘मी परदेशांतील खेळपट्टय़ांवर फारसे सामने खेळलेलो नाही. परंतु कसोटी सामने खेळण्याचा पुरेसा अनुभव माझ्यासाठी उपयुक्त ठरेल. खेळपट्टीद्वारे गोलंदाजांना कितपत साथ मिळू शकेल, हे मला खात्रीने सांगता येते,’’ असे उमेश यावेळी म्हणला.