भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेली टी-20 मालिका रद्द न केल्यास आत्महत्या करेन, अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीने दिली आहे. याप्रकरणी गुजरातमधील चांदखेडा पोलिस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, १२ मार्च रोजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक के.व्ही. पटेल यांना गांधीनगरमधून पंकज पटेल नावाच्या व्यक्तीने फोन केला. विशेष म्हणजे अहमदाबादच्या ज्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत-इंग्लंड सामने होत आहेत, त्या स्टेडियमच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पथकात पटेल यांचा समावेश आहे. करोनाचा वाढता प्रादूर्भाव बघता जर भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका रद्द केली नाही तर आत्मदहन करेन अशी धमकी त्याने पटेल यांना दिली. शनिवारी त्याच्या धमकीची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियात व्हायरल झाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर सामना बघायला येणाऱ्या प्रेक्षकांकडून नियमावलीचं पालन होत नाही, हे धोकादायक ठरु शकतं. त्यामुळे जर भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका रद्द केली नाही तर आत्मदहन करेन अशी धमकी त्याने पटेल यांना दिली.
“धमकी देणाऱ्याने गुजरात सरकार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठीही अवमानकारक भाषेचा वापर केला. मी त्याला नाव विचारल्यावर त्याने गांधीनगरमधून पंकज पटेल बोलत असल्याचं सांगितलं. त्यानंतर मी लगेच गांधीनगर पोलीस कंट्रोल रुमला फोन केला आणि त्याचा फोन नंबर अधिकाऱ्यांना दिला”, असं पटेल यांनी एफआयआरमध्ये नमूद केलं आहे. धमकी देणाऱ्याविरोधात अहमदाबादच्या चांदखेडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 505 (2), 507, 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टी-20 मालिकेसाठी सुरूवातीला प्रेक्षकांना ५० टक्के क्षमतेने स्टेडियममध्ये प्रवेश दिला जात होता. पण काल झालेल्या तिसऱ्या सामन्यापासून उर्वरित सामन्यांमध्ये प्रेक्षकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2021 10:25 am