मोहालीतील आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमला दिवंगत माजी हॉकी खेळाडू आणि पद्मश्रीप्राप्त बलबीर सिंग सीनियर यांचे नाव दिले जाणार आहे. २५ मे रोजी बलबीर सिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा सन्मान त्यांना दिला जाईल. पंजाब ट्रिब्यून डॉट कॉमच्या वृत्तानुसार, क्रीडा विभागाचे प्रवक्ते म्हणाले, की पंजाबचे क्रीडामंत्री राणा गुरमीतसिंग सोधी यांनी मोहालीच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमच्या नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

तीन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन असलेल्या बलबीर सिंग सीनियरचा आतापर्यंत ऑलिम्पिक फायनचा प्रवास अजिंक्य असा आहे. बलबीर सिंग १९४८, १९५२ आणि १९५६  साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते. ते १९५२च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे ध्वजवाहक बनले होते. या स्पर्धेत भारताने एकूण १३ गोल केले. यातील तब्बल ९ गोल बलबीर यांनी केले. यात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील हॅट्ट्रिकचा समावेश आहे. नेदरलँडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्यांनी ५ गोल केले. अंतिम सामन्यात एका खेळाडूंने केलेले हे सर्वाधिक गोल आहेत. हा एक विक्रम आहे. आजघडीपर्यंत कोणत्याही हॉकीपटूला हा विक्रम मोडता आला नाही. भारताने हा सामना ६-१ ने जिंकला होता.

बलबीरसिंग हे १९७१च्या विश्वचषक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे व्यवस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक होते. त्यांनी क्रीडा विभाग पंजाबचे संचालक म्हणून काम केले आणि तरुणांना खेळाकडे प्रोत्साहित केले.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने, आधुनिक ऑलिम्पिक इतिहासातील १६ महान खेळाडूची निवड केली होती. यात बलबीर सिंग यांचाही समावेश आहे.

हेही वाचा – PSLमधून बाहेर पडला शाहिद आफ्रिदी, दुसऱ्या आफ्रिदीनं घेतली जागा