उत्तर प्रदेशमधील बेकायदा कत्तलखान्यांवरील कारवाईचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने समर्थन केले आहे. उत्तरप्रदेशमधील बेकायदा कामे बंद झालीच पाहिजे. आता गुंडमुक्त राज्य हवे असे सांगत मोहम्मद कैफने योगी आदित्यनाथांचे समर्थन केले आहे.
गोहत्येचे कट्टर विरोधक असलेले योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच पोलिसांनी राज्यातील बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. अवैधपणे गायींची तस्करी करणाऱ्या आणि बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेशच पोलीस महासंचालक जावेद अहमद यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. पोलिसांनी आत्तापर्यंत १२ बेकायदा कत्तलखान्यांना टाळे ठोकले आहे. तसेच गायींची तस्करी केल्याप्रकरणी २७ तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, ४३ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे लखनौमधील सुप्रसिद्ध ‘टुंडे कबाब’ तयार करणाऱ्या फूड स्टॉलधारकांवर संकट आले आहे. या कारवाईला कत्तलखाना चालकांकडून विरोध होत असतानाच मोहम्मद कैफ या कारवाईच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. ट्विटरवर या कारवाईचे समर्थन करताना कैफ म्हणाला, टुंडे मिळो किंवा न मिळो. आता उत्तरप्रदेशला गुंडे मुक्त होताना बघायला आवडेल. अवैध धंदे बंद झालेच पाहिजे. सरकारने योग्य निर्णय घेतला असे त्याने म्हटले आहे.
Tunday milein ya na milein,Gundein na milein!Will be happy to see No Gunday in UP.All illegal stuff must be stopped.Good moves #UPshouldgoUP
— Mohammad Kaif (@MohammadKaif) March 25, 2017
कैफने भाजपचे समर्थन करण्याची ही पहिली वेळ नाही. कैफने काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली असली तरी आता तो भाजपचे समर्थन करताना दिसतो. उत्तरप्रदेशमधील निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या भाजपला कैफने शुभेच्छाही दिल्या होत्या.
योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदावर निवड झाल्यावर वाद सुरु होता. यावरही कैफने योगी आदित्यनाथांची बाजू घेतली होती. प्रत्येकाला स्वत:चे मत असते. पण आपण वादविवादाऐवजी नवनियुक्त सरकारला शुभेच्छा दिल्या पाहिजे असे कैफने म्हटले होते. योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा. उत्तरप्रदेशला ते विकासाच्या मार्गावर नेऊन जनतेचे भविष्य उज्ज्वल करतील अशी आशा असेही कैफने म्हटले होते.