भारताचा मधल्या फळीतील फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ याने आज स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर तब्बल १२ वर्षांनी कैफने निवृत्तीची घोषणा केली आहे. योगायोग म्हणजे २००२ साली आजच्या दिवशी इंग्लंडविरुद्ध झालेल्या नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांनी झुंजार खेळी करून भारताला विजय मिळवून दिला होता. या मालिका विजयानंतर गांगुलीने टी-शर्ट काढून विजयोत्सव साजरा केला होता. या विजयाला १६ वर्षे पूर्ण होतानाच कैफने हा निर्णय जाहीर केला आहे.

मी सर्व प्रकारच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधून आणि स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. इंग्लंडमधील त्या नॅटवेस्ट मालिका विजयाला आज १६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच दिवसाचे औचित्य साधत मी निवृत्तीचा निर्णय घेत आहे. राष्ट्रीय संघाकडून खेळता आले हे मी माझे भाग्य समजतो आणि ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट होती. १२५ एकदिवसीय आणि १३ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना मला फार अभिमान वाटला, असे कैफने बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी के खन्ना आणि कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांना पाठवलेल्या इ मेलमध्ये लिहिले आहे. उत्तर प्रदेशच्या संघासाठी रणजी करंडक जिंकलेल्या कैफने आपला अंतिम सामना छत्तीसगड संघाकडून खेळला होता.