भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीनंतर त्याच्या आतापर्यंतच्या योगदानाबद्दल त्याचं कौतुक केलं आहे. १५ ऑगस्टला संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना धोनीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत निवृत्ती जाहीर केली. तब्बल १६ वर्ष धोनीने भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत रवी शास्त्री यांनी धोनी हा भारतीय क्रिकेटच्या महान खेळाडूंपैकी एक मानला जाईल असं म्हटलंय.

“धोनी हा प्रचंड चपळ आहे. रांची सारख्या ठिकाणावरुन भारतीय संघात स्थान मिळलवलेल्या धोनीने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून टाकला. महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने कसोटी, वन-डे आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारात आपली जादू दाखवली. टी-२० विश्वचषक, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी, वन-डे विश्वचषक हे सगळं धोनीमुळे शक्य झालंय. या संपूर्ण प्रवासात तो नेहमी शांत होता. जी गोष्ट त्याच्या फलंदाजी आणि कर्णधारपदाबद्दल तीच त्याच्या यष्टीरक्षणाबद्दल…त्याच्या यष्टीरक्षणाच्या शैलीमध्ये तंत्र नव्हतं. पण त्याचा वावर हा प्रभावशाली होता. यष्टीरक्षक म्हणून तुम्ही त्याचा भारतीय संघावरचा प्रभाव पाहा, तुम्हाला कल्पना येईल. स्टम्पिंग किंवा रन आऊट करताना तो ज्या पद्धतीने हालचाल करायचा हे पाहण्यासारखं असायचं. त्याचे हात इतक्या चपळतेने चालायचे की एखाद्या पाकीटमारालाही तो मागे टाकेल. समोरच्या फलंदाजाला धोनीने मला बाद केलंय हे समजायचंही नाही. धोनी महान खेळाडू होण्यामागे या गोष्टी कारणीभूत आहेत.” रवी शास्त्रींनी धोनीचं कौतुक केलं.

धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर संघातला त्याचा साथीदार सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालाधीत आयपीएलचा तेरावा हंगाम युएईत रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही धोनी पुढील काही वर्ष आयपीएल खेळत राहणार आहे. निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी धोनीने CSK चे मालक आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनीवासन यांच्याशी चर्चा केल्याचं समजतंय. चेन्नईकडून पुढचे काही हंगाम खेळत राहणार असल्याचं धोनीने सांगितलं असून भविष्यातही संघाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायला धोनीला आवडणार आहे…असंही धोनीने CSK प्रशासनाला कळवलं आहे.