विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. वन-डे मालिका ३-० ने गमावल्यानंतर कसोटी मालिकाही भारताने २-० ने गमावली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर दोन्ही कसोटी सामन्यांत भारताचे फलंदाज ढेपाळले. अजिंक्य रहाणे, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा हे बिनीचे शिलेदार अपयशी ठरल्यामुळे भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं. भारतीय संघाच्या या पराभवावर उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आखुड टप्प्याच्या चेंडूंचा मारा करत भारतीय फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. “लोकं विनाकारण या गोष्टीवर चर्चा करत आहेत. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न कसोटी सामन्यात आम्ही चांगली कामगिरी केली होती. आम्ही सर्वांनी आखुड टप्प्याचे चेंडू चांगल्या पद्धतीने खेळले. एका सामन्यातील किंवा मालिकेतील खराब कामगिरीमुळे तुम्ही वाईट फलंदाज ठरत नाही. न्यूझीलंडमध्ये वाऱ्याची दिशा हा महत्वाचा मुद्दा ठरतो, आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी या गोष्टीचा चांगला वापर करत आम्हाला अडकवलं”, रहाणे पत्रकारांशी बोलत होता.

अजिंक्य रहाणेही न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत सपशेल अपयशी ठरला. २१.५० च्या सरासरीने रहाणेने केवळ ९१ धावा केल्या. ४६ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. मात्र या गोष्टींचा फारसा विचार न करण्याचं अजिंक्यने ठरवलं आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत गुणांकन महत्वाचं आहे. त्यामुळे एखाद्या मालिकेत पराभव झाल्यामुळे भारतीय संघ वाईट ठरत नसल्याचंही अजिंक्यने स्पष्ट केलं.