इंडियन सुपर लीग (आयएसएल) क्लब बंगळुरू एफसीने भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीशी दोन वर्षांचा नवा करार केला आहे. या करारानंतर छेत्री आता २०२३ पर्यंत बंगळुरू एफसीकडे असेल. रविवारी क्लबने ही माहिती दिली. बंगळुरु एफसीने आपल्या संकेतस्थळावर सांगितले, की क्लबने भारतासाठी सर्वोच्च आंतरराष्ट्रीय गोल नोंदवणाऱ्या छेत्रीशी दोन वर्षांचा नवा करार केला आहे. छेत्री २०१३मध्ये बंगळुरू एफसीमध्ये दाखल झाला. भारतीय कर्णधाराने बंगळुरु एफसीकडून आतापर्यंत २०३ सामन्यांत १०१ गोल केले आहेत.

करारानंतर छेत्रीची प्रतिक्रिया

या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ३६ वर्षीय छेत्री म्हणाला, “बंगळुरू एफसीबरोबर आणखी दोन वर्षे करार केल्याने मला खरोखर आनंद झाला आहे. बंगळुरू हे आता माझे घर आहे, आणि या क्लबचे लोक माझ्या कुटुंबासारखे आहेत. मी कालच करार केल्यासारखे वाटत आहे. मला हा क्लब, समर्थक आणि शहर आवडते. या तिन्हीही व्यक्तींशी माझा एक घट्ट संबंध आहे. मी त्यांच्याबरोबर बर्‍याच अद्भुत क्षणांचा भाग होण्याची अपेक्षा करतो.”

 

हेही वाचा – कसोटीत ७०८ बळी घेणाऱ्या वॉर्नला सेहवाग म्हणतो, ‘‘तू फिरकी गोलंदाजी समजण्याचा प्रयत्न कर”

सहा वेळा एआयएफएफ प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणाऱ्या छेत्रीने २०१३मध्ये क्लबबरोबर पहिले लीगचे जेतेपद जिंकले होते. त्यानंतर त्याने क्लबसह फेडरेशन कप (२०१५, २०१७), इंडियन सुपर लीग (२०१८-१९) आणि सुपर कप (२०१८) यासह आणखी पाच चषक जिंकले आहेत. छेत्रीने अलीकडेच आपला ७६वा आंतरराष्ट्रीय गोल केला आहे.