सय्यद किरमाणी यांचे मत

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मालिका खेळवण्यात यावी किंवा नाही, याबाबतच्या चर्चा झडत असताना भारताचे माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांनीही याबाबतीत आपले मत व्यक्त केले आहे. भारताने पाकिस्तानशी मालिका खेळण्यात काहीच गैर नाही, पण दोन्ही देशांमधील वातावरण पाहता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारत सरकारच्या निर्णयाचा आदर करायला हवा, असे मत किरमाणी यांनी व्यक्त केले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये या महिन्यात मालिका होणे अपेक्षित होते. पण बीसीसीआयने हा निर्णय भारत सरकार घेईल, असे स्पष्ट केले होते. पण सरकारने याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने ही मालिका खेळवण्यात आली नाही.

‘‘माझ्या मते पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळण्यात काहीच चुकीचे नाही, पण त्यासाठी दोन्ही देशांतील राजकीय वातावरण पाहायला हवे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि बीसीसीआय यांना या मालिकेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण त्यांनी भारत सरकारच्या निर्णयाची वाट पाहावी आणि त्या निर्णयाचा आदर करावा,’’ असे किरमाणी म्हणाले.

गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्या क्रिकेट मंडळांमध्ये एक करार करण्यात आला होता. त्यानुसार २०१५ ते २०२३ या वर्षांमध्ये सहा द्विदेशीय मालिका खेळवण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. २००८ नंतर उभय देशांमध्ये कसोटी मालिका खेळवण्यात आलेली नाही.भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील वातावरणाबद्दल किरमाणी म्हणाले की, ‘‘भारत आणि पाकिस्तान ही दोन शेजारी राष्ट्रे आहेत, पण या शेजाऱ्यांमध्ये तणावाची परिस्थिती का निर्माण होते? भांडण, युद्ध करून काय निष्पन्न होणार आहे? हे सारे कशासाठी होत आहे? असे प्रश्न मला पडलेले आहेत. माझ्या मते दोन शेजाऱ्यांमध्ये सलोखा असायला हवा. त्यांच्यामध्ये मैत्री असायला हवी.’’

ते पुढे म्हणाले की, ‘‘भारत-पाकिस्तान यांच्यामधील सामन्यांना प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती असते. हे सामने नेहमीच हाऊसफुल्ल असतात. त्यामुळे ही मालिका झाल्यास प्रेक्षकांना चांगलीच मेजवानी मिळेल.’’

खेळात राजकारण नको

खेळात राजकारण असू नये, असे माझे वैयक्तिक मत आहे. खेळाडूंमध्ये चांगला सलोखा असायला हवा, त्यामध्ये राजकारणाचा लवलेशही नसावा. खेळाडूंनी खेळभावनेनेच खेळायला हवे. त्यांच्यामध्ये चांगले नाते असायला हवे.

दिवस-रात्र कसोटी असावी

जर एकदिवसीय सामना दिवस-रात्र खेळवला जाऊ शकतो, तर कसोटी सामना का नाही? माझ्या मते दिवस-रात्र कसोटी सामन्याला अधिक पसंती मिळेल. चाहते त्यांचे काम संपवून या सामन्याचा निखळ आनंद लुटू शकतील.

खेळपट्टीपेक्षा कामगिरीची चर्चा हवी

नागपूर कसोटीबाबत जेफ क्रो यांनी केलेले विधान मला मान्य नाही. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ६० धावांमध्ये तंबूत धाडले होते, त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडने १५ धावांमध्ये आठ बळी मिळवले होते, त्या वेळी इंग्लंडमधल्या खेळपट्टीची चर्चा झाली नाही. माझ्या मते खेळपट्टीपेक्षा कामगिरीची चर्चा व्हायला हवी.