ऑस्ट्रेलियामध्ये २०२० साली होणाऱ्या T20 World Cup 2020 स्पर्धेतील सगळे संघ आता निश्चित झाले आहेत. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत यजमान संघ (ऑस्ट्रेलिया) आणि जागतिक टी २० क्रमवारीतील सर्वोत्तम नऊ संघांना थेट प्रवेश देण्यात आला होता. तर पात्रता फेरीतील सामन्यांनंतर उर्वरित सहा संघांचे या स्पर्धेतील स्थान निश्चित झाले.

पात्रता फेरीतून सर्वप्रथम आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड्स आणि पापुआ न्यू गिनी हे देश पात्र ठरले. त्यानंतर बुधवारी रात्री ओमान व स्कॉटलंड या दोन संघांनी T20 World Cup 2020 मधील प्रवेश पक्का केला. ओमानने अटीतटीच्या सामन्यात हाँगकाँगवर १२ धावांनी विजय मिळवली आणि T20 World Cup 2020 स्पर्धेतील सहभाग निश्चित केला. तर स्कॉटलंडने युनायटेड अरब अमिरातीला (युएई) ९० धावांनी धूळ चारत T20 World Cup 2020 स्पर्धेतील स्थान निश्चित केले. यापैकी नामिबिया आणि पापुआ न्यू गिनी पहिल्यांदा टी २० विश्वचषक स्पर्धा खेळणार आहेत.

पात्रता फेरीतून सहा संघांनी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये प्रवेश केला आहे. या पात्रता स्पर्धेची उपांत्य फेरी व अंतिम फेरी अद्याप बाकी आहे. त्यासाठी चुरस रंगणार आहे. शुक्रवारी होणाऱ्या दोन उपांत्य फेरीच्या लढतीत आयर्लंड वि. नेदरलँड्स आणि पापुआ न्यू गिनी वि. नामिबिया हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. विजेत्यांमध्ये शनिवारी अंतिम लढत रंगणार आहे.

T20 World Cup 2020 च्या फॉरमॅटनुसार या सहा संघांना पहिल्या फेरीत दोन वेगवेगळ्या गटात क्रमवारीतील नवव्या आणि दहाव्या स्थानी असलेल्या संघांविरूद्ध खेळावे लागणार आहे. त्यानंतर या दोन गटातील सर्वाधिक गुण मिळवलेला प्रत्येकी १ संघ आणि क्रमवारीतील ८ संघ यांच्यात T20 World Cup 2020 स्पर्धेचे मूळ सामने रंगणार आहेत.

थेट प्रवेश मिळालेले संघ :

ऑस्ट्रेलिया (यजमान संघ)
भारत
पाकिस्तान
इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
न्यूझीलंड
वेस्ट इंडीज
अफगाणिस्तान
श्रीलंका (पात्रता फेरी खेळणारे संघ)
बांगलादेश (पात्रता फेरी खेळणारे संघ)

पात्रता फेरीतून आलेले संघ :

आयर्लंड
नामिबिया
नेदरलँड्स
ओमान
पापुआ न्यू गिनी
स्कॉटलंड