करोना विषाणूचा फटका जगभरातील क्रीडा विश्वाला बसला आहे. बीसीसीआयलाही आपला २०१९-२० चा स्थानिक क्रिकेट हंगाम मध्यावरच थांबवावा लागला. आयपीएलचा तेरावा हंगामही बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर क्रिकेट पुन्हा सुरु होईल अशी बोर्डाला आशा आहे. मात्र करोनामुळे आयसीसीसह संपूर्ण क्रिकेट बोर्डाला होत असलेल्या आर्थिक नुकसानाचा विचार करत, बीसीसीआय एकाच वेळी भारताचे दोन संघ मैदानात उतरवण्याचा विचार करत आहे. म्हणजेच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळेल तर लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध वन-डे आणि टी-२० मालिका खेळेल असा बीसीसीआयचा प्लॅन आहे. Sportsstar या संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी बीसीसीआयची ओळख असली तरीही या परिस्थितीचा फटका बीसीसीआयलाही बसला आहे. यातून बाहेर पडण्यासाठीच या पर्यायाचा विचार केला जात असल्याचं समजतंय. सध्याच्या परिस्थिती क्रीडा स्पर्धा विशेषकरुन आंतरराष्ट्रीय क्रिकेट कधी सुरु होईल हे कोणालाही माहिती नाही. पण बोर्डाशी निगडीत असलेल्या सर्व व्यक्तींची काळजी घ्यायची असेल तर एकाच वेळी दोन संघ मैदानात उतरवणं हा एक पर्याय असल्याचं बीसीसीआयमधील सुत्रांनी Sportsstar ला सांगितलं. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु होण्याआधी आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन केलं जाईल याची बीसीसीआय काळजी घेईल असंही सुत्रांनी स्पष्ट केली.

दरम्यान, बीसीसीआयनेही वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यास होकार दर्शवला आहे. मात्र या स्पर्धेआधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात स्वतःला दोन आठवडे क्वारंटाइन करेल अस मतही बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी मांडलं आहे. “कसोटी मालिका खेळायची असेल तर स्वतःला क्वारंटाइन करण्यापलिकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये. तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा एकदा सुरु करायचं असेल तर हे करावंच लागेल. दोन आठवड्यांचा कालावधी हा कोणत्याही क्रीडापटूसाठी योग्य आहे. फक्त त्याआधी दोन्ही देशांमधलं सरकार नेमकं काय नियम आखून देतंय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.” धुमाळ The Sydney Morning Herald वृत्तपत्राशी बोलत होते.