भारतात सर्वात लोकप्रिय असलेल्या IPL स्पर्धेला करोनाचा फटका बसला. आधी २९ मार्च आणि नंतर १५ एप्रिलला नियोजित असलेली IPLस्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 World Cup बाबत अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. जुलै महिन्यात या संदर्भात ICC ची बैठक होणार आहे. त्यानंतर विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार की नाही, यावर निर्णय होणार आहे. जर विश्वचषक स्पर्धा रद्द झाली, तर भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये IPL स्पर्धेचे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या दरम्यान मुंबईकर खेळाडू धवल कुलकर्णी याने IPL मध्ये सध्या खेळत असलेल्या खेळाडूंपैकी सर्वोत्तम ११ खेळाडूंचा एक संघ जाहीर केला.

सलामीवीर म्हणून धवल कुलकर्णीने संघात रोहित शर्मासोबत वेस्ट इंडिजचा धमाकेदार फलंदाज ख्रिस गेल याची निवड केली. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर त्याने बंगळुरू संघाचे दोन महारथी विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांना संघात स्थान दिले. पाचव्या जागेसाठी त्याने सुरेश रैनाची निवड केली, तर सहाव्या स्थानी संघाचे नेतृत्व करणाऱ्या धोनीचा समावेश केला. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील ड्वेन ब्राव्हो, हार्दिक पांड्या आणि रशिद खान यांना संघात पसंती दिली असून जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांना वेगवान गोलंदाज म्हणून संघात घेतले.

धवल कुलकर्णी

संघ – रोहित शर्मा, ख्रिस गेल, विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, ड्वेन ब्राव्हो, हार्दिक पांड्या, रशिद खान, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची IPL बाबत महत्त्वाची माहिती

“IPL चे आयोजन याच वर्षात करण्यासाठी BCCI कडून सर्व प्रकारच्या पर्यायांची चाचपणी सुरू आहे. जरी प्रेक्षकांविना सामने खेळवण्याची वेळ आली तरीही चालेल. चाहते, संघ व्यवस्थापन, खेळाडू, ब्रॉडकास्टर्स, प्रायोजक आणि समभागधारक सारेच IPL 2020 च्या आयोजनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. IPL मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय आणि परदेशी खेळाडूंनी मधल्या काळात IPL खेळण्याबाबत उत्सुक असल्याचे म्हटले होते. आम्ही आशावादी आहोत. BCCI लवकरच IPL च्या आयोजनासंदर्भात निर्णय घेईल”, असे BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले.