भारत-इंग्लंड कसोटी मालिका

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे बिरुद मिरवणाऱ्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर बुधवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना प्रकाशझोतात रंगणार आहे. गुलाबी चेंडूनिशी रंगणाऱ्या या लढतीसाठी खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना उत्तम साथ देईल, परंतु वेगवान गोलंदाजांचीही भूमिका महत्त्वाची राहील, असा दावा भारताचा कर्णधार विराट कोहलीने केला आहे.

अहमदाबाद हे शहर भारतीय क्रिकेटमधील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार ठरले आहे. सुनील गावस्करच्या लक्षवेधी लेटकटने कसोटी क्रिकेटमधील १० हजारांचा टप्पा, कपिलदेवची ८३ धावांत ९ बळी अशी भेदक कामगिरी आणि रिचर्ड हॅडलीचा सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम हे यापैकी काही महत्त्वाचे क्षण. यात इशांत शर्माच्या कारकीर्दीतील १००व्या कसोटी सामन्याची भर पडणार आहे. जगातील सर्वाधिक प्रेक्षकक्षमतेच्या स्टेडियममध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पटेल स्टेडियमवर (१,१०,०००) तिसऱ्या कसोटीसाठी ५५ हजार प्रेक्षकांना प्रवेश मिळणार आहे. परंतु नूतनीकरणामुळे बऱ्याच वर्षांनी या स्टेडियमवर सामना होत असल्याने भारतीय संघाच्या वर्चस्वाबाबत शंका घेतली जात आहे. परंतु जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना लक्ष्यस्थानी असलेल्या मालिकेत सध्या दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधली असून, अहमदाबादच्या विजयासह आघाडी कोण घेणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

इंग्लंडमध्ये जर जो रुट वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्टीला प्राधान्य देत असेल, तर भारतात रविचंद्रन अश्विन किंवा अक्षर पटेलसाठी अनुकूल खेळपट्टय़ा तयार केल्यास काय बिघडते, असे रोखठोक स्पष्टीकरण अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने दिले आहे. परंतु अनुत्तरित राहिलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या सामन्यात मिळतील. सामना दुपारी सुरू होत असल्याने अखेरच्या सत्रात दव हा घटक महत्त्वाचा ठरेल. त्या वेळी फिरकी गोलंदाजांना चेंडू पकडणे कठीण जाईल. आतापर्यंत झालेल्या १५ प्रकाशझोतातील सामन्यांत वेगवान गोलंदाजांनी २४.४७च्या सरासरीने ३५४ बळी मिळवले आहेत, तर फिरकी गोलंदाजांनी ३५.३८च्या सरासरीने ११५ बळी मिळवले आहेत.

उमेश, सिराज की पंडय़ा?

तिसऱ्या कसोटीसाठी मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला वगळून वेगवान माऱ्याच्या त्रिकुटाची भारत रणनीती आखणार आहे. तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाल्यामुळे उमेश यादवचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे इशांत शर्मा आणि जसप्रित बुमराच्या साथीने तिसऱ्या स्थानासाठी उमेश, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंडय़ा असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. कमाल १५ षटके टाकण्याची क्षमता असलेल्या पंडय़ाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून विचार केला जाऊ शकतो.

मोईनच्या जागी बेसचा समावेश?

इंग्लंडच्या ताण व्यवस्थापन योजनेनुसार मोईन अली मायदेशी परतला आहे. त्यामुळे जॅक लीचच्या साथीने फिरकी माऱ्याची धुरा डॉम बेसवर सोपवली जाऊ शकते. परंतु जेम्स अँडरसन आणि जोफ्रा आर्चरच्या साथीला स्टुअर्ट ब्रॉड किंवा मार्क वूडला संधी मिळेल का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रॉरी बर्न्‍सच्या जागी गुणी फलंदाज झ्ॉक क्रॉवली संघात स्थान मिळवेल, तसेच तिसऱ्या क्रमांकावर डॅन लॉरेन्सऐवजी जॉनी बेअरस्टो खेळेल.

६  अश्विनला (३९४ बळी) कसोटी क्रिकेटमध्ये चारशे बळींचा टप्पा गाठण्यासाठी सहा बळींची गरज आहे.

११ १००वा कसोटी सामना खेळणारा इशांत भारताचा ११वा खेळाडू आहे.

४ १००वा कसोटी खेळणारा इशांत हा अनिल कुंबळे, कपिलदेव आणि हरभजन सिंग यांच्यानंतर चौथा भारतीय गोलंदाज आहे, तर कपिलनंतर दुसरा वेगवान गोलंदाज आहे.

९  कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या अनिल कुंबळेला (६१९ बळी) मागे टाकण्यासाठी इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला (६११ बळी) नऊ बळींची आवश्यकता आहे.

संघ

*  भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के. एल. राहुल, हार्दिक पंडय़ा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

*  इंग्लंड : जो रुट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डॉमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्‍स, झ्ॉक क्रॉवली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, मार्क वूड.

कोहलीचे शतकाचे ग्रहण सुटणार?

कोहलीने अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक २०१९ मध्ये ईडन गार्डन्सवर बांगलादेशविरुद्ध नोंदवले होते. तो भारताचा पहिलावहिला प्रकाशझोतातील कसोटी सामना होता. त्यानंतर गेल्या ३४ डावांत कोहली शतकापासून वंचित राहिला आहे. हा त्याच्या कारकीर्दीतील सर्वात दीर्घ टप्पा आहे. त्यामुळे अहमदाबादला भारताच्या दुसऱ्या प्रकाशझोतातील सामन्यात कोहलीचे शतकाचे ग्रहण सुटणार का, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. विराटने कर्णधार म्हणून ४२वे शतक साकारल्यास रिकी पाँटिगला (४१ शतके ) तो मागे टाकू शकेल.

* वेळ : दुपारी २.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १,  स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि एचडी वाहिन्या.