सध्या जमैकामध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेची धामधूम सुरू आहे. या स्पर्धेत ६ संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी झुंजत आहेत. त्यातच रविवारी गयाना अ‍ॅमेझॉन वॉरियर्स आणि बार्बाडॉस ट्रायडंट्स यांच्यात सामना सुरू होता. त्या सामन्यात राखीव खेळाडू असलेल्या वॉल्शने एक भन्नाट झेल टिपला. सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर प्रायमसने गोलंदाजी केली. ऑफ-स्टंपच्या थोडा बाहेर जाणारा चेंडू फलंदाज शिमरॉन हेटमायरने टोलवला. चेंडू हवेत असताना चौकार जाणार असे वाटत होते. पण तेवढ्यात राखीव खेळाडू वॉल्शने झेप घेत झेल घेतला. CPL ने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात गयानाने प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकात ४ बाद १८० धावा केल्या. गयानाकडून चंद्रपॉल हेमराजने ५५ चेंडूत ६३ धावा केल्या, तर निकोलस पूरनने अवघ्या ३० चेंडूत ६१ धावा केल्या. त्याने त्या खेळीत ३ चौकार आणि ५ षटकार ठोकले. तर रूदरफर्डने १४ चेंडूत ३२ धावांची खेळी केली.

१८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बार्बाडॉसचा संघ मात्र १३३ धावांवर सर्वबाद झाला. त्यांच्या संघाकडून नर्सने केवळ ४० धावा केल्या. बाकीच्या फलंदाजांना फारशी कामगिरी करता आली नाही.

‘गेल’ वादळ थांबता थांबेना! टी २० मध्ये केलं विक्रमी शतक

कॅरेबियन प्रीमिअर लीग (CPL) स्पर्धेत देशभरातील धडाकेबाज खेळाडूंचा विविध संघांमध्ये भरणा आहे. याच स्पर्धेत युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलच्या वादळी खेळीने मंगळवारची संध्याकाळ गाजवली. त्याने धडाकेबाज शतकी खेळी केली. त्याने ५४ चेंडूत १०० धावा केल्या आणि CPL मध्ये तब्बल ४ शतके करण्याचा विक्रम रचला. याशिवाय टी २० क्रिकेटमध्येही हे त्याचे २२ शतक ठरले. जमैका थलायवाज आमि पॅट्रिओट्स संघांमधील या सामन्यात तब्बल ३९ षटकांत ४८३ धावा ठोकण्यात आला. या टी २० सामन्यात तब्बल ३७ षटकार लगावण्यात आले. एका टी २० क्रिकेट सामन्यात एकाच सामन्यात एवढे षटकार लागण्याची ही दुसरी वेळ ठरली. या सामन्यात ३७ षटकारांची आतषबाजी झाली. यापूर्वी २०१८ मध्ये अफगाणिस्तान प्रीमिअर लीग स्पर्धेत बल्ख लीजंड्स आणि काबुल झ्वानन या संघामध्ये झालेल्या सामन्यात ३७ षटकार मारण्यात आले होते.