भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीदरम्यान वानखेडे मैदानात ओल असल्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीला गंभीर दुखापत होता होता वाचली. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्याची १०५ वी ओव्हर सुरू होती. इंग्लंडच्या क्रिस वोक्स ने एक आर. अश्विनच्या चेंडूवर एक फटका मारला. तो चेंडू सीमेपलीकडे जात होता.

त्यामागे विराट कोहली जीव तोडून पळाला आणि नेहमी प्रमाणे गुडघा जमिनीवर टेकवून थोडेसे घसरुन मग चेंडू पकडण्यासाठी विराट कोहली गेला असता त्याच्या गुडघ्याला थोडी इजा झाली. मैदानावर ओल असल्यामुळे तो घसरण्याऐवजी त्याचा गुडघा जमिनीत रुतला आणि त्याच्या गुडघ्याला इजा झाली.

त्याच्यानंतर तेथे भुवनेश्वर कुमार आला आणि त्याने पहिले चेंडू अडवून तो अश्विनकडे फेकला आणि कोहलीची विचारपूस केली. त्या वेळेपुरता खेळ थांबला होता. त्यानंतर थोडासा व्यायाम करुन विराट कोहली पुन्हा मैदानात उतरला.

इंग्लंडच्या सर्वबाद ४०० धावा झाल्या आहेत. भारतीय खेळाडू मैदानात उतरले असून भारताच्या हातात नऊ विकेट्स आहेत. रविचंद्रन अश्विनच्या प्रभावी फिरकीच्या बळावर भारताने इंग्लंडला नियंत्रणात ठेवले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर भारतात खेळण्याचा दांडगा अनुभव गाठीशी असणारा संघनायक अ‍ॅलिस्टर कुक आणि जेनिंग्स यांनी ९९ धावांची दमदार सलामी दिली.

२६व्या षटकात रवींद्र जडेजाकडे विराट कोहलीने चेंडू दिला आणि भारताला पहिले यश मिळाले. कुक ४६ धावांवर माघारी परतला. पुढे जाऊन खेळण्याचा त्याचा प्रयत्न पार्थिव पटेलने यष्टिचीत करून हाणून पाडला. मग जो रूट (२१) फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्यानंतर जेनिंग्स आणि मोईन अली यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. अश्विनचे ७१वे षटक महत्त्वाचे ठरले. त्याने दुसऱ्या चेंडूवर मोईनला (५०) आणि चौथ्या चेंडूवर किटनला तंबूची वाट दाखवली. जॉनी बेअरस्टोसुद्धा फारसा प्रभाव पाडू शकला नाही.