विजयाची प्रतीक्षा करणाऱ्या विश्वनाथन आनंद या भारताच्या माजी विश्वविजेत्या खेळाडूला सिंक्वेफील्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत अमेरिकेच्या वेस्ली सो याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली.
आनंदला या स्पर्धेतील गेल्या पाच डावांमध्ये बरोबरी पत्करावी लागली आहे. शेवटच्या दोन फे ऱ्या बाकी असून तो संयुक्तरीत्या आठव्या क्रमांकावर आहे. त्याने अमेरिकेच्या फॅबिआनो कारुआना याच्या साथीत प्रत्येकी अडीच गुण घेतले आहेत. या स्पर्धेत अर्मेनियाच्या लिवॉन आरोनियन याने स्थानिक खेळाडू हिकारू नाकामुरा याच्यावर शानदार विजय मिळवीत अग्रस्थानावर झेप घेतली आहे. त्याने सातव्या फेरीअखेर पाच गुणांची कमाई केली आहे.
रशियाच्या अ‍ॅलेक्झांडर ग्रिसचुक याने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन याला पराभवाचा धक्का दिला. फ्रान्सच्या मॅक्झिम व्हॅचिअर लाग्रेव्ह याने कारुआना याला बरोबरीत रोखले. नेदरलँड्सच्या अनीश गिरी याला व्हॅसेलीन तोपालोव्हविरुद्ध अध्र्या गुणावर समाधान मानावे लागले. कार्लसन, गिरी, ग्रिसचुक व लाग्रेव्ह यांचे प्रत्येकी चार गुण आहेत. तोपालोव्ह व नाकामुरा यांचे प्रत्येकी साडेतीन गुण झाले आहेत. वेस्ली याने केवळ दोन गुणांची कमाई केली आहे.