अजिंक्‍य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने चौथा कसोटी सामना जिंकला आणि यासोबतच बॉर्डर-गावसकर मालिकाही २-१ अशी खिशात टाकून इतिहास रचला. भारताच्या ऐतिहासिक विजयात ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा यांच्याशिवाय वॉशिंग्टन सुंदरनेही महत्त्वाची भूमिका बजावली. वॉशिंग्टन सुंदरला गाबा टेस्टमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आणि पहिल्याच सामन्यात त्याने दोन्ही डावांत एकूण चार विकेट झळकावल्या, तर पहिल्या डावात फलंदाजी करताना अर्धशतक झळकावून त्याने भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढले. पण आता सर्वांनाच आश्चर्य वाटेल की, गाबा टेस्टमध्ये खेळण्यासाठी सुंदरकडे पांढरे पॅड्स नव्हते. कसोटी सामना सुरू झाल्यानंतर पॅड्स खरेदी करण्यासाठी त्याला दुकानात जावं लागलं. भारतीय टीमचे फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांनी हा खुलासा केलाय.

वॉशिंग्टन सुंदर टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला होता, त्याला काही सामन्यात संधी मिळाली. कसोटी संघात तर त्याचा समावेशही नव्हता, पण कसोटी मालिकेदरम्यान भारतीय फलंदाजांच्या सरावासाठी नेट गोलंदाज म्हणून सुंदरला ऑस्ट्रेलियात थांबवण्यात आलं. पण चौथ्या आणि अखेरच्या कसोटीआधी रविचंद्रन अश्विन जखमी झाल्यामुळे अचानक सुंदरचा अंतिम ११ मध्ये समावेश करण्यात आला.

सुंदरकडे होते नीळे पॅड्स :-
सुंदरची फक्त टी-२० मालिकेसाठी निवड झाली होती. त्यामुळे त्याने पांढरे पॅड्स सोबत आणले नव्हते, केवळ निळे पॅड्स घेऊन तो ऑस्ट्रेलियात पोहोचला होता. नेट्समध्ये तो निळे पॅड्स घालून फलंदाजीचा सराव करायचा. तेलंगणा टुडेसोबत बोलताना श्रीधर यांनी खुलासा केला की, “सुंदरसाठी पॅड्स शोधण्यासाठी भारतीय संघाने आणि सपोर्ट स्टाफने बराच प्रयत्न केला. आम्ही सुंदरसाठी पॅड्स शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याची उंची जास्त असल्यामुळे पाहिजे तसे पॅड्स भेटत नव्हते. आम्ही ऑस्ट्रेलियाच्या टीमकडूनही पॅड्स घेण्याचा विचार केला पण करोनामुळे ते त्यांचे पॅड्स देऊ शकत नव्हते. अखेर गाबा टेस्ट सुरू झाल्यानंतर आम्ही दुकानात गेलो आणि नवीन पॅड्स खरेदी केले.”