भारत-इंग्लंड यांच्यात चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला आजपासून(दि.४) सुरूवात होणार आहे. पण, अजूनही दोन दिवसांमध्ये संपलेल्या तिसऱ्या कसोटीवरुन चर्चा सुरूच आहे. तिसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीवरुन अनेक दिग्गज क्रिकेटपटू प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक यानेही खेळपट्टीवर टीका केली असून आयसीसीने खेळपट्टीवरुन कारवाई करायला हवी, असंही इंझमाम म्हणाला.

“कोणी विचारही केला नसेल आणि मला आठवत पण नाही की शेवटची टेस्ट मॅच दोन दिवसात कधी संपली होती? भारत चांगला खेळला की खेळपट्टीचा परिणाम होता? अशाप्रकारच्या खेळपट्ट्या खरंच कसोटी सामन्यांसाठी बनवाव्यात का? मला वाटलं भारत खरोखर दमदार प्रदर्शन करतोय, त्यांनी दुसऱ्या कसोटीत शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवलं. पण…अशाप्रकारच्या खेळपट्टी बनवणं क्रिकेटसाठी चांगलं नाहीये असं मला वाटतं”, असं इंझमाम आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणाला.

“अहमदाबाद कसोटीत दिसली त्यापेक्षा तर टी-२० सामन्यातील धावसंख्या चांगली असते. अशी ही कोणती खेळपट्टी आहे जिथे दोन दिवसांमध्येच कसोटी सामना संपतो….एकाच दिवसात १७ विकेट पडतात…आयसीसीने यावर कारवाई करावी. तुम्ही घरच्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी फिरकीला अनुकूल असणाऱ्या खेळपट्टी नक्कीच बनवाव्यात पण अशाप्रकारच्या खेळपट्ट्या क्रिकेटमध्ये नसाव्यात. ज्या खेळपट्टीवर इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट गोलंदाजी करुन 8 धावा देऊन 5 विकेट्स घेतो तिथे भारताच्या रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेलच्या गोलंदाजीचं कौतुक का करायचं?, कसोटी सामना कसोटी सामन्याप्रमाणे व्हायला हवा…मला नाही वाटत की टीम इंडियाला ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर जे समाधान मिळालं होतं तेच समाधान इंग्लंडला हरवून मिळालं असेल” असंही इंझमाम म्हणाला.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या सामन्याला आजपासून सुरूवात होत असून या सामन्यातही वर्चस्व गाजवून इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकण्यापेक्षा लॉर्ड्सवर जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे लक्ष्य असेल.