Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येतात तेव्हा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. मात्र, या दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवली जात नाही. त्यामुळे दोन्ही संघ केवळ आशिया चषक आणि आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांचा सामना करतात. दोन्ही संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत आमनेसामने आले होते. मात्र, हा सामना दुबईत रंगला होता. आता आशिया चषक स्पर्धेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी आशिया चषक स्पर्धेला येत्या १० सप्टेंबरपासून सुरूवात होऊ शकते. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ सहभाग घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळू शकतो.

आशिया चषक स्पर्धेसाठी जोरदार तयारी

आगामी आशिया चषक स्पर्धा पाहता, आशियाई क्रिकेट परिषदेने या स्पर्धेच्या आयोजनासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेत ६ संघ खेळताना दिसून येऊ शकतात. ज्यात भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि युएई हे ६ संघ असतील. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात या स्पर्धेच्या आयोजनाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

स्पर्धेचे आयोजन कुठे होणार?

येत्या २०२६ मध्ये आयसीसी टी –२० वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. ही स्पर्धा पाहता आगामी आशिया चषक स्पर्धा टी –२० स्वरूपात खेळवली जाऊ शकते. या स्पर्धेचे यजमानपद बीसीसीआयकडे आहे. मात्र, दोन्ही देशातील तणावाची स्थिती पाहता पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही. याआधीही आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असताना भारत – पाकिस्तान सामना श्रीलंकेत खेळवला गेला होता. तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सामना दुबईत खेळवला गेला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळीही भारत – पाकिस्तान सामना दुबईत खेळवला जाऊ शकतो. या स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये केले जाऊ शकते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले गेले होते. आता पाकिस्तानचा संघही भारतात येण्यास नकार देत असल्याने हे सामने दुबईत खेळवले जाऊ शकतात.