ऑस्ट्रेलियाचा (Australia) कर्णधार अॅरॉन फिंच गेल्या काही दिवसांपासून खराब खेळीचा सामना करताना दिसत आहे. वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी फिंच काही दिवसांपासून झगडत आहे. या दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. अॅरॉन फिंचने शनिवारी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अचानक जाहीर केलेल्या या निवृत्तीमुळे अॅरॉन फिंचच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना
अॅरॉन फिंच आज शनिवारी (१० सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या भविष्याविषयी मोठी घोषणा करणार असल्याची चर्चा होती . या चर्चा खऱ्या ठरवत त्याने अखेर वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रविवारी (११ सप्टेंबर) न्यूझीलंडविरुद्ध होणारा तिसरा एकदिवसीय सामना त्याच्या या फॉरमॅटमधील कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल.
एकदिवसीय सामन्यांमध्ये फिंचची कामगिरी खालावली
एकदिवसीय सामन्यांमध्ये फिंच याची कामगिरी खालावली आहे. गेल्या ७ डावात त्याने एकूण २६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तो तीन वेळा ० धावांवर बाद झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला दोन्ही डावात केवळ ५ धावा करता आल्या आहेत.
अॅरोन फिंचची कामगिरी
३६ वर्षाच्या अॅरोन फिंचने अचानक क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याने आत्तापर्यंत त्याच्या कारर्कीदीत १४५ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ५४०१ धावा केल्या आहेत. आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे त्याने आत्तापर्यंत १७ शतके झळकावली आहेत.
टी-२० विश्वचषकादरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचं कर्णधार पद अॅरोन फिंचकडे
पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकादरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचं कर्णधार पद अॅरोन फिंचकडे सोपवण्यात आलं आहे. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी तो ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. याशिवाय २०२० मध्ये त्याला ऑस्ट्रेलियाचा ‘मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारही मिळाला आहे.