BCCI central contract Shreyas Iyer : टीम इंडियाचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यरचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक करारबद्ध खेळाडूंच्या सूचीत समावेश झाला आहे. श्रेयसच्या बरोबरीने इशान किशनचाही करारबद्ध खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने वर्षभरापूर्वी श्रेयसला या यादीतून वगळलं होतं. आता त्याने त्याच्या उत्तुंग कामगिरीच्या जोरावर करारबद्ध खेळाडूंच्या यादीत दिमाखात प्रवेश केला आहे.

बीसीसीआयने श्रेयसबरोबरचा करार रद्द केल्यानंतर श्रेयसच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल जेतेपदावर (२०२४) नाव कोरलं. पाठोपाठ मुंबईच्या संघाने रणजी करंडक पटकावला त्या संघाचा श्रेयस भाग होता. मुंबईने इराणी करंडकावरही नाव कोरलं. त्या संघातही श्रेयस होता. देशातील सगळ्यात मोठी टी-२० स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचं विजेतेपद मुंबईने पटकावलं. त्या संघातही श्रेयस होता. काही महिन्यांपूर्वीच भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. त्या विजेत्या संघाचा श्रेयस अविभाज्य घटक होता. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतातर्फे सर्वाधिक धावा श्रेयसनेच केल्या होत्या.

श्रेयसला वार्षिक करारातून का वगळलं होतं?

बीसीसीआयने सर्वच खेळाडूंना प्रथम श्रेणी सामन्यात खेळणे बंधनकारक केलं होतं. श्रेयस व इशान किशन आपापल्या संघांसाठी खेळू शकले नव्हते. पाठीच्या दुखण्यामुळे श्रेयस मुंबईसाठी काही सामने खेळू शकला नाही. या कारणास्तव दोघांची करार यादीतून हकालपट्टी करण्यात आली. करार यादीतून वगळल्यामुळे दोघांनाही कराराच्या माध्यमातून मिळणारं वार्षिक मानधन मिळू शकलं नाही. करारबद्ध सूचित नसल्यामुळे भारतीय संघाकडून खेळल्यास खेळाडूंना केवळ सामना शुल्क (मॅच फी) मिळतं.

बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंची यादी

अ प्लस श्रेणीत विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. रवीचंद्रन अश्विन निवृत्त झाल्यामुळे त्याचा करार यादीत समावेश करण्यात आलेला नाही.

ऋषभ पंतला बढती मिळाली असून, त्याचा समावेश अ श्रेणीत करण्यात आला आहे. अ श्रेणीत मोहम्मद सिराज, के. एल. राहुल, शुबमन गिल, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.

ब श्रेणीत श्रेयससह कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल आणि सूर्यकुमार यादव आहेत.

तर, इशान किशनचं नाव क श्रेणीत आहे. क श्रेणीत इशानसह नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल, अभिषेक शर्मा, सर्फराझ खान, आकाश दीप, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा यांचा समावेश आहे.

या खेळाडूंचा करार रद्द

क श्रेणीतून शार्दूल ठाकूर, जितेश शर्मा, के. एस. भरत आणि अवेश खान यांना डच्चू देण्यात आला आहे.

खेळाडूंना किती रुपयांचं मानधन मिळणार?

बीसीसीआयने श्रेणीनिहाय मानधनाची घोषणा केलेली नाही पण क्रिकइन्फो या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार अ प्लस श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक प्रत्येकी ७ कोटी रुपये, अ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक प्रत्येकी ५ कोटी, ब श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक प्रत्येकी ३ कोटी तर क श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक प्रत्येकी १ कोटी रुपये मानधन मिळणार आहे.