डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने मंगळवारी मुंबईचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यावर ‘बीसीसीआय’ने आठ महिन्यांच्या बंदीची कारवाई केली. पृथ्वी शॉवर बंदी घालण्यापूर्वीच केंद्र सरकारने बीसीसीआयला डोपिंग प्रणालीबाबत झापले होते. क्रीडा मंत्रायलाने बीसीसीआयचे सीईओ राहुल जौहरी यांना कठोर शब्दांत पत्र लिहिले होते. यामध्ये बीसीसीआयच्या डोपिंग प्रोग्राममधील त्रुटींबाबत भाष्य केलं होतं.

इंडियन एक्‍स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयला डोपिंग टेस्ट घेण्याचा आधिकार नाही. बीसीसीआयच्या डोपिंग टेस्टला भारत सरकार आणि विश्व डोपिंग संस्थाकडून (वाडा)आधिकृत मान्यता दिलेली नाही. क्रीडा मंत्रालयाने २६ जून रोजी बीसीसीआयला लिहिलेल्या पत्राच्या हवाल्याने इंडियन एक्‍स्प्रेस बीसीसीआयला फटकारल्याचे वृत्त दिले आहे. बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रानुसार, विश्व डोपिंग संस्थेच्या नियमातील कलम 5.2 नुसार खेळाडूंचे नमुना घेण्याचा अधिकार अधिकृत डोपिंग संघटनेकडेच असतो. बीसीसीआय वाडाच्या(विश्व डोपिंग संस्था) अंतर्गत डोपिंग चाचणी घेत नाही तसेच बीसीसीआयला स्वत: डोपिंग चाचणी घेण्याचा आधिकार नाही.

राष्ट्रीय डोपिंग संस्थेशी (नाडा) निगडित नसल्यामुळे बीसीसीआय आणि सरकारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. देशातील इतर खेळातील खेळाडू नाडासोबत जोडले आहेत पण बीसीसीआय या अंतर्गत येत नाही. बीसीसीआयच्या मते नाडाच्या नियमांत अनेक उणिवा आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे नियम पाळत नाही. त्याचप्रमाणे बीसीसीआय सरकारच्या आर्थिक मदतीनुसार चालणारी संस्था नाही. त्यामुळे आम्ही नाडाच्या अंतर्गत येत नाही.

रिपोर्टनुसार, क्रीडा मंत्रालयाने पाठवलेल्या पत्रामध्ये सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बीसीसीआय डोपिंग चाचणीसाठी वापरत असलेल्या तंत्रज्ञानावरही या पत्रात क्रीडा मंत्रालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. २०१८ मध्ये बीसीसीआयने २१५ नमुने नाडामध्ये पडताळणीसाठी पाठवले होते. त्यामध्ये पाच दोषी आढळले होते. पण ते नमुने कोणाचे होते याबाबत अद्याप समोर आले नाही, असे बीसीसीआयला पाठवलेल्या पत्रात म्हटलेय.