BCCI on Rahul Dravid: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) राहुल द्रविडला पुन्हा टीम इंडियाचे प्रशिक्षक करायचे आहे. बोर्ड पुन्हा द्रविडला दोन वर्षांचा करार देऊ इच्छित आहे, परंतु माजी भारतीय कर्णधाराने संघाबरोबर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. दोन्ही प्रसंगी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.
बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “बीसीसीआय सचिव जय शाह यांनी गेल्या आठवड्यात द्रविडशी चर्चा केली आहे. नवीन कराराच्या तपशीलावर काम करणे बाकी आहे. द्रविडने कसोटी संघाबरोबर दक्षिण आफ्रिकेला जावे, अशी बीसीसीआयची इच्छा आहे.” द्रविड करारावर स्वाक्षरी न करता दौऱ्यावर जाण्यास तयार होईल का, असे विचारले असता? यावर सूत्राने सांगितले की, “करारावर काम केले जाईल परंतु कसोटी मालिका महत्त्वाची आहे आणि जरी तो दक्षिण आफ्रिकेतील टी -२० मालिकेसाठी गेला नसला तरीही तो वन डे मालिकेसाठी संघात सामील होऊ शकतो.”
आयपीएल की बीसीसीआय?
बीसीसीआयने हा प्रस्ताव दिल्यानंतर राहुल द्रविड बुचकळ्यात पडला आहे, असे मानले जाते की त्याला मार्गदर्शक बनण्यासाठी दोन आयपीएल संघांकडून ऑफर आहेत. आता तो दोन वर्षांसाठी टीम इंडियात सामील होतो की दोन महिने चालणाऱ्या आयपीएलच्या एका हंगामासाठी कोणत्याही संघाशी करार करतो का, हे पाहायचे आहे. त्याने यापूर्वी काही काळ राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये काम केले आहे. बीसीसीआयने द्रविड समोर नवा पर्याय ठेवला आहे. सूत्रांनी माहिती दिली की, “त्यांनी टीम इंडियाचे प्रशिक्षकपद घ्यावे.”
लक्ष्मणचं काय होणार?
व्हीव्हीएस लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख राहणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० मालिकेदरम्यान तो संघाचे प्रशिक्षक होऊ शकतो. बीसीसीआयच्या सूत्राने पुढे सांगितले की, “लक्ष्मण एनसीएच्या कामात व्यस्त आहे तसेच, पुढे आणखी एक अंडर-१९ विश्वचषकही येत आहे. भारत अ संघाचा दक्षिण आफ्रिका दौराही जवळ आला आहे. नवीन एनसीए सुविधेच्या बांधकामाबाबत क्रिकेटच्या बाबींमध्येही त्याचा सहभाग आहे, त्यामुळे तो भारतीय संघाचा प्रशिक्षक होणे सध्यातरी अशक्य आहे.”
हेही वाचा: IND vs AUS: टीम इंडियाच्या पराभवानंतर सूर्यकुमार यादवचे मोठे विधान; म्हणाला, “हा वेडेपणा होता…”
द्रविडचा कार्यकाळ किती असेल?
द्रविडचा कार्यकाळ किती काळ असेल हे पाहणे रंजक ठरणार आहे. पुढील टी-२० विश्वचषक किंवा २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत तो संघाबरोबर असू शकतो. याच काळात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपही आहे.