World Cup 2023, India vs Australia Updates: भारतीय क्रिकेट संघ रविवारी विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्याच्यासमोर पहिले आव्हान ऑस्ट्रेलियाचे असणार. हा सामना चेन्नईत होणार आहे. फिरकी गोलंदाज आर अश्विन त्याच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे. अश्विन केवळ गोलंदाजीच नव्हे तर फलंदाजीलाही धार लावण्यात व्यस्त आहे. ऑस्ट्रेलियासाठी ही धोक्याची घंटा आहे. आयसीसीनेही एक व्हिडिओ शेअर करून ऑस्ट्रेलियाला इशारा दिला आहे.
अश्विनचा व्हिडीओ व्हायरल –
आयसीसीने रविवारी एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा तणाव वाढणार. हा व्हिडीओ भारताच्या सराव सत्राचा आहे, ज्यामध्ये अश्विन फलंदाजी करताना दिसत आहे. एकामागून एक चेंडू तो सीमापार पाठवत होता. जणू काही पूर्णवेळ फलंदाज सराव करत आहे. टीम इंडियाने अश्विनला सलामीला पाठवावे, अशी प्रतिक्रियाही चाहत्यांनी दिली.
ऑस्ट्रेलियाचा तणाव वाढला –
अश्विनचा हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियासाठी मोठा पेच निर्माण करणारा आहे. मायदेशात अश्विनचा गोलंदाजीचा विक्रमच धडकी भरवणारा नाही, तर त्याची फलंदाजीही ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणू शकते. अश्विनने देशांतर्गत टी-२० लीगमध्येही टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी केली आहे. एक परिपक्व अष्टपैलू खेळाडू म्हणून या स्पर्धेत उतरणार असल्याचे भारतीय फिरकी गोलंदाजाने दाखवून दिले आहे. केवळ ऑस्ट्रेलियाच नाही तर इतर सर्व संघांनाही अश्विनपासून दूर राहण्याची गरज आहे.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची खात्री आहे. चेन्नईच्या खेळपट्टीचा विचार करता अश्विनचे संघात राहणे फायदेशीर ठरू शकते. अश्विन प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे याचा अर्थ भारत तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरेल. अश्विनशिवाय कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे देखील संघात असतील.
चेन्नईत अश्विनचा विक्रम –
चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये अश्विनने गोलंदाजी करताना एकूण ५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २०१० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३ विकेट्स घेतल्या होत्या. वेस्ट इंडिजविरुद्ध २ विकेट्स घेतले होते. त्याचबरोबर २०१२ मध्ये त्याला पाकिस्तानविरुद्ध एकही विकेट घेण्यात यश आले नव्हते. त्याने येथे तीनपैकी दोन सामन्यांत फलंदाजी केली आहे. यामध्ये अश्विनने ४२ धावा केल्या आहेत.