१९७५ च्या जून महिन्यात झालेला पहिला एकदिवसीय विश्वचषक हे सर्वांसाठी नवं प्रकरण होतं. याचं कारण एक एकदिवसीय क्रिकेट यामध्येच अजुन भलेभले क्रिकटपटू रुळले नव्हते. अशा परिस्थितीत या पहिल्या विश्वचषकात त्यावेळी मान्यता असलेले आठ संघ सहभागी झाले होते. भारताने वेस्टइंडिज आणि इंग्लडला कसोटी क्रिकेटमध्ये हरवून चार वर्षे झाली होती आणि या काळात कसोटी पराभवांमुळे भारतीय संघाचा रुबाबही बऱ्यापैकी खाली आला होता. फॉर्मात असलेला बलाढ्य वेस्ट इंडिजचा संघ, संभाव्य विजेते म्हणून बघितले जाणारे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सारखे देश यामुळे भारताला कोणी गंभीरपणे घेतलं नव्हतं.

१९७५च्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात इंग्लड विरुद्ध सुनील गावस्कर यांनी संपुर्ण इनिंग खेळून काढत १३६ चेंडूत काढलेल्या ३६ धावांमुळे त्यांच्यावर बरीच टिका झाली होती. असं असलं तरी दुसऱ्या सामन्यात भारताने अत्यंत दुबळ्या अशा ईस्ट ऑफ्रिका विरुद्ध सहज विजय मिळवला. खरं तर या विजयाची चर्चा होण्याची शक्यता पण नव्हती. पण तेव्हा बिशन सिंग बेदी यांनी टाकलेल्या गोलंदाजीच्या स्पेलमुळे हा सामना चर्चेत राहिला.

ईस्ट आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा एक इंनिंग ही ६० षटकांची असायची. ५६ व्या षटकात ईस्ट आफ्रिकेचा संघ अवघ्या १२० धावा करत सर्वबाद झाला. भारताने हा सामना १० गडी राखत सहज जिंकला देखील. या सामन्यात मदनलाल यांनी सर्वाधिक म्हणजे ३ विकेट तर सईद अबिद अली आणि मोहिंदर अमरनाथ यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मात्र बिशन सिंग बेदी यांना एकच विकेट मिळाली. असं असलं तरी बेदी यांनी १२ ओव्हर टाकतांना तब्बल ८ ओव्हर निर्धाव-मेडन टाकल्या आणि उर्वरित चार ओव्हरमध्ये फक्त सहा धावा दिल्या. टिच्चून गोलंदाजी करत ईस्ट आफ्रिकेच्या फलंदाजांना बेदी यांनी हैराण करुन सोडलं होतं.

त्या काळातील कसोटी सामन्यांमधील एक सर्वोत्कृष्ठ फिरकीपटू म्हणून बिशन सिंग बेदी यांची ओळख होती. भल्या भल्या फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या भारताच्या फिरकीपटूच्या चौकडीचे बेदी नेतृत्व करायचे. १९६६ ते ७९ या काळात क्रिकेट खेळतांना कसोटीत टिच्चून गोलंदाजीसाठी आणि त्यांनी मिळवलेल्या विकेटस् मुळेच बेदी यांची एकप्रकारे दहशत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असं असलं तरी अवघे १० एकदिवसीय सामने खेळलेल्या बेदी यांनी ईस्ट आफ्रिके विरुद्ध अजरामर असा १२-८-६-१ स्पेल टाकत एक विक्रमच केला होता. आजही एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत economy rate च्या बाततीत तो स्पेल उत्कृष्ठ मानला जातो.