पुणे : राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठी आमचा वरिष्ठ, कुमार आणि कुमारी गट २०१५पासून प्रयत्न करीत होता. परंतु यश आमच्या हातातून थोडक्यात निसटत होते. यंदा गेल्या अनेक वर्षांची मेहनत फळाला आल्याने कुमारी गटाने विजेतेपद मिळाले, अशा भावना पालघर संघाचे प्रशिक्षक विशाल पाटील यांनी व्यक्त केल्या.

‘‘कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी मागील दीड महिन्यापासून आम्ही तयारीस सुरुवात केली. मुलींची निवड करण्यासाठी सहा दिवस शिबिराचे आयोजन करुन त्यातून एकूण १५ मुलींमधून आम्ही १२ मुलींचा संघ निवडला. यामध्ये आम्ही चढाईला जास्त प्राधान्य दिले. संघाचे व्यवस्थापक म्हणून आम्ही वर्षां भोसले यांना आमंत्रित केले. आमच्या संघातील पाच खेळाडू कुमारी वरिष्ठ गटामध्ये या आधी खेळल्या असल्याने त्यांना चांगला अनुभव होता. आमच्याकडून चांगला खेळ होत होता त्यामुळे आम्ही जिंकू शकतो असा विश्वास होता,’’ असे पाटील यांनी सांगितले. पालघरने परभणीत वरिष्ठ महिला निवड चाचणीत तृतीय क्रमांक, काल्हेर येथे महिला-पुरुष निवड चाचणीत उपांत्य फेरी गाठली होती.

‘‘अंतिम सामन्यात पुणे संघाचे क्षेत्ररक्षण समन्वय थोडे कमजोर आहे, हे आम्ही आधीच जाणले होते. त्यामुळे आम्ही चढाईला जास्त प्राधान्य दिले. आमची प्रमुख मदार असलेल्या ज्युली मिस्किटाने चढाईत आपली भूमिका चोख बजावली. उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठी तिला राखून ठेवण्याची चाल यशस्वी ठरली,’’ असे पाटील यांनी सांगितले

कुमार गटाच्या विजेत्या कोल्हापूर जिल्हा संघाचे प्रशिक्षक अमित संकपाळ म्हणाले, ‘‘स्पर्धेच्या १५ दिवस आधी आम्ही शिबीर घेतले. त्यात २५ मुलांमधून आम्ही बचाव फळीवर भर देत १२ जणांची निवड केली. आमच्या संघ चढाईमध्ये चांगला होता. आम्ही सांघिक खेळ करण्याचा प्रयत्न केला. चार ते पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळवलेले विजेतेपद आनंददायी आहे. कारण या आधी मिळालेल्या विजेतेपदावेळीदेखील प्रशिक्षक म्हणून मीच काम पाहिले होत,’’ असे संकपाळ यांनी सांगितले.