आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) तिन्ही प्रारूपांसाठी आणखी काही नियमांत बदल केले असून ‘कन्कशन’नंतर (डोक्याला चेंडू लागणे) आता खेळाडूला सात दिवस विश्रांती सक्तीची करण्यात आली आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये चेंडू आणि बॅट यात समतोल साधण्यासाठी चेंडूच्या वापराबाबतही काही बदल करण्यात आले आहेत.

जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) नव्या पर्वापासून नियमबदल लागू करण्यात आले आहेत. या पर्वाला श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेने सुरुवात झाली. याच दोन संघांत २ जुलैपासून मर्यादित षटकांच्या मालिकाही खेळविण्यात येणार आहेत. प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका रंगणार असून नवे नियम यात वापरले जातील.

‘वाइड’ चेंडूच्या बाबतीतही थोडा बदल करण्यात आला आहे. पूर्वी पांढऱ्या रेषेबाहेरील चेंडू थेट ‘वाइड’ ठरवला जायचा. मात्र, आता चेंडू टाकण्यापूर्वी फलंदाजाचे पाय कुठे होते हे लक्षात घेऊन त्याच्यासह रेषाही पुढे जाणार आहे. हा बदल सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर अवलंबण्यात येणार आहे. याला ऑक्टोबर २०२५ पासून सुरुवात होईल.

तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये चेंडूच्या वापराचा नियमही बदलण्यात येणार आहे. एकदिवसीय सामन्यात एका डावात दोन नवे चेंडू वापरले जात होते. त्यामुळे रीव्हर्स स्विंग मिळत नसल्याची तक्रार गोलंदाजांकडून केली जात होती. आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३४ व्या षटकापर्यंतच दोन चेंडू वापरले जातील आणि त्यानंतर एकाच चेंडूसह सामना खेळला जाईल. अखेरच्या १६ षटकांत दोनपैकी कुठला चेंडू वापरायचा हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर अवलंबून असेल. यामुळे मोठ्या धावसंख्यांना आळा बसेल आणि सामने अधिक चुरशीचे होतील अशी ‘आयसीसी’ची धारणा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कन्कशन’बाबत नियम सुधारणा

● ‘कन्कशन’च्या नियमात दोन बदल करण्यात आले आहेत. आधीच्या नियमानुसार, सामन्यादरम्यान खेळाडूच्या डोक्याला चेंडू लागल्यास दौऱ्यावर आलेल्या चमूतील कुठल्याही खेळाडूचा अंतिम ११ मध्ये समावेश केला जायचा. त्यामुळे काही वेळा फलंदाज जायबंदी झाला, तरी त्याच्या जागी गोलंदाजाला संघात स्थान दिले जायचे. याबाबत प्रतिस्पर्धी संघांकडून तक्रार व्हायची.
● आता अशा घटना घडू नयेत यासाठी संघांना आधीच बदली खेळाडूचे नाव द्यावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे फलंदाज जायबंदी झाला, तर बदली खेळाडू फलंदाजच असेल. गोलंदाजाच्या जागी गोलंदाज आणि अष्टपैलूच्या जागी अष्टपैलूच घेता येईल.
● अन्य बदल म्हणजे, ‘कन्कशन’ झालेल्या खेळाडूला सात दिवस विश्रांती सक्तीची असेल. त्यानंतरच त्याला मैदानावर पुनरागमन करता येईल. खेळाडूंची सुरक्षितता आणि आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी ‘आयसीसी’च्या वैद्याकीय सल्लागार समितीने या बदलाची शिफारस केली.