ENG vs SL Joe Root overtaken Kumar Sangakkara as highest run scorer in Test : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज जो रूट गेल्या काही काळापासून चांगल्या फॉर्ममध्ये असून तो सतत नवनवीन विक्रम आपल्या नावावर करत आहे. लंडनच्या केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात तिसरी कसोटी खेळली जात असून या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रूटने आणखी एक पराक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रूटने श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराला मागे टाकले आहे. या यादीत रूटने आता सहावे स्थान पटकावले आहे.
जो रुटने १४६ कसोटी सामन्यात १२४०२ धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी, रुट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सातव्या क्रमांकावर होता. मात्र, या सामन्यात फलंदाजीमध्ये रुटला काही विशेष कामगिरी करता आली नाही. त्याने पहिल्या डावात १३ आणि दुसऱ्या डावात १२ धावा केल्या. पण कसोटीत १३४ सामन्यांत १२४०० धावा करणाऱ्या संगकाराला मागे टाकण्यात तो यशस्वी ठरला. श्रीलंकेचा माजी कर्णधार संगकाराने कसोटीत ३८ शतके आणि ५२ अर्धशतके केली आहेत.
जो रूट कूकला मागे सोडण्याच्या जवळ –
इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकला मागे टाकत रुट कसोटीत सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज होण्याच्या जवळ आहे. कुकने आपल्या कसोटी कारकिर्दीत १६१ सामन्यात १२४७२ धावा केल्या आहेत. रूटने आणखी ७१ धावा केल्या की, तो कुकला मागे टाकेल आणि अशा प्रकारे तो कसोटी फॉरमॅटमध्ये इंग्लंडचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरेल. इंग्लडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत रुटने याआधीच कुकला मागे टाकले आहे. या फॉरमॅटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक शतके करणारा रूट हा फलंदाज आहे. रुटने आतापर्यंत कसोटीत ३४ शतके झळकावली आहेत, तर कुकच्या नावावर ३३ शतके आहेत.
हेही वाचा – ‘शपथ घे की धाव घेणार नाहीस’; ऋषभ-कुलदीपचा मजेशीर संवाद व्हायरल
कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर –
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. मास्टर ब्लास्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत २०० सामन्यांमध्ये १५९२१ धावा केल्या आहेत. २०० कसोटी खेळण्याव्यतिरिक्त सचिनने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत ४६३ एकदिवसीय आणि एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग १३३७८ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा – IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! यश दयालसह ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
सचिन तेंडुलकर- १५९२१ धावा
रिकी पॉन्टिंग – १३३७८ धावा
जॅक कॅलिस- १३२८९ धावा
राहुल द्रविड- १३२८८ धावा
ॲलिस्टर कुक- १२४७२ धावा
जो रूट- १२४०२ धावा