Gautam Gambhir says Rohit and Virat are in form and should be select : अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांची निवड करावी की नाही, हा आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ पूर्वीचा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही कर्णधार रोहितबद्दल सांगितले की इतक्या लवकर स्पष्टीकरणाची काय गरज आहे. सध्या आयपीएल खेळायचे आहे, त्याशिवाय अफगाणिस्तानविरुद्धची मालिकाही आहे. आता माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने रोहित आणि विराटबाबत वक्तव्य केले आहे. गंभीरने रोहित आणि विराटला वर्ल्डकपमध्ये संधी द्यावी की नाही, यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘वय न बघता खेळाडूंचा फॉर्म बघावा’ –
विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल स्पोर्ट्सकीडाशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, “वयाचा काही संबंध नाही. केवळ वयाच्या आधारावर आपण खेळाडूंना बाहेर ठेवू नये, खेळाडूंनी फॉर्ममध्ये राहणे अधिक महत्त्वाचे आहे. खेळाडू फॉर्ममध्ये असतील, तर त्यांना नक्कीच संधी मिळायला हवी. गंभीर म्हणाला की, “टी-२० विश्वचषकासाठी आपण अशा खेळाडूंची निवड केली पाहिजे, जे खरोखरच चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. रोहित आणि विराट जर चांगल्या फॉर्ममध्ये असतील तर त्यांची टी-२० विश्वचषकासाठी नक्कीच निवड झाली पाहिजे.”
‘पाचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणे सोपे नाही’ –
गौतम गंभीरनेही माजी सलामीवीर रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे त्याने समर्थन केले आणि त्याला बढती मिळायला हवी असे सांगितले. आयपीएलमधील रोहितच्या कर्णधारपदाचा उल्लेख करताना गंभीर म्हणाला की, “रोहितने मुंबईसाठी पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत, हे सोपे नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने विश्वचषकात शानदार कामगिरी केली. फक्त एक सामना तुम्ही चांगला संघ आहात की नाही हे ठरवत नाही. अशा स्थितीत भारताला फायनल जिंकता आली नाही, त्यामुळे रोहित शर्मा हा वाईट कर्णधार आहे, असे म्हणता येणार नाही.”
हेही वाचा – WPL 2024 Auction : मुंबई इंडियन्सने लिलावात ‘या’ पाच खेळाडूंना केले खरेदी, शबनिम इस्माईल ठरली सर्वात महागडी
‘रोहित शर्मा फक्त फलंदाज म्हणून नको’ –
गौतम गंभीरन पुढे म्हणाला, “विराट आणि रोहितची निवड होणे गरजेचे आहे, त्यामुळे दोघांची निवड केली पाहिजे. विशेष म्हणजे मला रोहित शर्माला टी-२० विश्वचषकात कर्णधार म्हणून पाहायला आवडेल आहे. होय, हार्दिक टी-२० मध्ये कर्णधार आहे, पण तरीही मला रोहितला विश्वचषकात कर्णधार म्हणून बघायला आवडेल. त्यामुळे रोहित शर्माची फक्त फलंदाज म्हणून निवड करु नका.”