India vs Australia 3rd Test: आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत आधीच २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. ही कसोटी जिंकून भारतीय संघाला मालिका जिंकायची आहे. तसेच, हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो सध्या खूप महागात पडताना दिसत आहे.

आज सामना सुरू झाल्याच्या तासाभरातच भारताने पाच गडी गमावले आहेत. भारताची धावसंख्या सध्या ४५ असताना निम्मा संघ तंबूत परतला होता. सामना ९.३० वाजता सुरू झाला आणि १०.३० पर्यंत रोहित शर्मा (१२), शुबमन गिल (२१), चेतेश्वर पुजारा (१), रवींद्र जडेजा (४) आणि श्रेयस अय्यर (०) तंबूत परतले. आतापर्यंतच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंचे वर्चस्व राहिले आहे. मॅथ्यू कुह्नेमनने रोहित, शुबमन आणि श्रेयसला बाद केले. त्याचवेळी नॅथन लायनने चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजाला बाद केले. सध्या विराट कोहली आणि केएस भरत खेळपट्टीवर खेळत आहेत.

तिसऱ्या कसोटीत ऑसी कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मिचेल स्टार्क व कॅमेरून ग्रीन हे दोन तगडे खेळाडू संघात परतल्याने कांगारूंची ताकद वाढली आहे. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ संघाचे नेतृत्व करतोय. स्टार्कच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मा दोन वेळा बाद होता, परंतु ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये निर्णय क्षमतेचा अभाव जाणवला अन् रोहितला जीवदान मिळाले. पण, कर्णधार स्मिथच्या चतुराईने भारताचे तीन फलंदाज एकापाठोपाठ एक असे धडाधड माघारी परतले. सध्या भारताची धावसंख्या ही १७ षटकात ६६ असून विराट कोहली १९ धावांवर खेळत आहे.

हेही वाचा: IND vs AUS 3rd Test: भारतीय संघात केले दोन बदल, मोहम्मद शमीऐवजी उमेश यादवला मिळाले संघात स्थान

इंदोर येथे झालेल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांचेच पारडे जड राहिले आहे. अपेक्षित केएल राहुलला बाकावर बसवले गेले असून शुबमन गिलची एन्ट्री झाली पण तो मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरला. मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली असून उमेश यादव आज खेळणार आहे. मिचेल स्टार्कने दमदार सुरुवात केली. त्याने टाकलेला पहिलाच चेंडू रोहितच्या बॅटला लागून यष्टीरक्षक अ‍ॅलेक्स केरीच्या हाती विसावला. जोरदार अपील झाले, परंतु अंपायर नीतिन मेनन यांनी नाबाद दिले. डीआरएस घेण्याची संधी कर्णधार स्मिथकडे होती, परंतु यष्टिरक्षक व गोलंदाज यांना गॅरंटी नसल्याने त्याने रिव्ह्यू घेतला नाही. पण, त्यानंतर रिप्लेमध्ये चेंडू व बॅट यांच्यात संपर्क झाल्याचे स्पष्ट दिसले अन् ऑस्ट्रेलियाची घोर निराशा झाली.

Story img Loader