नवी दिल्ली : भारतीय क्रीडा क्षेत्राने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय यश संपादन केले असून निवडप्रक्रियेतील पारदर्शकता  हे यामागील प्रमुख कारण असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मोदी यांनी सोमवारी लाल किल्ल्यावर झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळय़ात देशाला संबोधित केले. या वेळी त्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राबाबतही आपले मत मांडले.

‘‘राजकारणाप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातही पूर्वी घराणेशाही होती. जागतिक क्रीडा स्पर्धासाठी भारतीय खेळाडूंच्या निवडप्रक्रियेत पारदर्शकतेची कमतरता होती. त्यामुळे अनेक प्रतिभावान खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या संधीला मुकावे लागत होते. अनेक खेळाडूंना संघ निवडीतील या आव्हानांवर मात करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वाट पाहावी लागली होती. निवडप्रक्रियेत पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असून परिस्थिती आता बदलत आहे. आपले खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. सुवर्ण आणि रौप्यपदकांच्या झळाळीने आपल्या युवकांचा आत्मविश्वास दुणावतो आहे,’’ असे मोदी म्हणाले.

‘‘भारतासाठी ही केवळ सुरुवात आहे. भारत कधी थांबत नाही किंवा थकत नाही. जागतिक स्पर्धामध्ये भारतीय खेळाडू अनेक सुवर्णपदके जिंकतील याची मला खात्री आहे. तो दिवस आता फार दूर नाही,’’ असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

गेल्या वर्षीच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य अशी विक्रमी एकूण सात पदकांची कमाई केली होती. तर नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला २२ सुवर्णपदकांसह एकूण ६१ पदके जिंकण्यात यश आले. भारतीय खेळाडूंच्या या यशाचे मोदींकडून सातत्याने कौतुक केले जाते. भारतीय खेळाडू महत्त्वाच्या जागतिक स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी आणि स्पर्धेत खेळून आल्यानंतर मोदी त्यांची भेट घेतात.

तसेच भारतात क्रीडासह सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे राजकारण दूर करणे गरजेचे असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. ‘‘घराणेशाहीचा अनेक क्षेत्रांवर विपरीत परिणाम होत आहे. प्रतिभावान व्यक्तींवर आणि देशाच्या प्रगती करण्याच्या क्षमतेवर मर्यादा येत असून भ्रष्टाचाराला चालना मिळत आहे. कुटुंबाच्या कल्याणाचा राष्ट्राच्या कल्याणाशी काहीही संबंध नाही. क्रीडा क्षेत्रात अशा व्यक्तींचा हस्तक्षेप थांबवणे आवश्यक आहे. ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सर्व क्षेत्रांत पारदर्शकता गरजेची आहे,’’ असे मोदी म्हणाले.

लक्ष्य ऑलम्पिक व्यासपीठ योजना फायदेशीर!

भारतीय खेळाडूंनी गेल्या काही वर्षांत मिळवलेल्या यशात लक्ष्य ऑलम्पिक व्यासपीठ योजना (टॉप्स) महत्त्वाची ठरली आहे. ‘टॉप्स’च्या मार्फत क्रीडापटूंना प्रोत्साहन दिले जाते आणि त्यांना खेळातील प्रगतीसाठी साहाय्य केले जाते. भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (साइ) खेळाडूंच्या कामगिरीकडे संपूर्ण वर्षभर लक्ष ठेवले जाते. तसेच ‘टॉप्स’मध्ये खेळाडूंच्या निवडीत पारदर्शकता ठेवण्यातही ‘साइ’ची महत्त्वाची भूमिका आहे. ‘‘आंतररराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामधील आपली यशस्वी कामगिरी प्रतिभावान युवा भारतीयांमधील क्षमता अधोरेखित करते. आपण या प्रतिभेला पािठबा आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे,’’ असे मोदींनी सांगितले.