शेवटच्या दहा मिनिटांमध्ये बचाव फळीतील शिथिलतेमुळेच भारताला अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत रविवारी दक्षिण कोरियाविरुद्ध १-२ असा पराभव स्वीकारावा लागला. भारताचा हा लागोपाठ दुसरा पराभव आहे. पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताला हरविले होते.
कांगारूंविरुद्ध चिवट लढत देणाऱ्या भारतीय खेळाडूंनी कोरियाविरुद्धही तितक्याच जिद्दीने खेळ केला. सहा युवा खेळाडूंसह खेळणाऱ्या भारताने कोरियाच्या अनुभवी खेळाडूंच्या गोल करण्याच्या अनेक चाली रोखून धरल्या. कोरियाकडून दोन्ही गोल करण्याचे श्रेय कांग मुआन क्विओन याला द्यावे लागेल. त्याने पूर्वार्ध संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना गोल केला तसेच त्याने सामन्याच्या ६०व्या मिनिटाला आणखी एक गोल केला. भारताचा एकमेव गोल मलक सिंग याने ३९व्या मिनिटाला नोंदविला.
लागोपाठ दुसरा सामना गमावल्यामुळे भारताचे बाद फेरीचे आव्हान कठीण झाले आहे. त्यांना सोमवारी पाकिस्तानशी खेळावे लागणार आहे. अव्वल साखळी गटात पहिले दोन क्रमांक मिळविणारे संघ अंतिम लढतीकरिता पात्र ठरणार आहेत.
भारताविरुद्धच्या लढतीत कोरियाने पूर्वार्धात पाच पेनल्टी कॉर्नर मिळविले. भारताला पूर्वार्धात एकही पेनल्टी कॉर्नर मिळाला नाही. भारताचा गोलरक्षक पी. श्रीजेश याने अतिशय कौतुकास्पद बचाव करीत कोरियाच्या अनेक चाली परतविल्या. २९व्या मिनिटाला कोरियाला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेताना त्यांनी थेट फटका न मारता पासिंग करत गोल करण्याचे डावपेच वापरले आणि ही रणनीती यशस्वी ठरली. उत्तरार्धात सुरुवातीपासून भारतीय खेळाडूंनी जोरदार आक्रमण केले. सामन्याच्या ३९व्या मिनिटाला मनदीप सिंग याने दिलेल्या पासवर मलक सिंगने शिताफीने गोल केला. हा गोल झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी आणखीही जोरदार आक्रमणे केली, मात्र गोल करण्याच्या दोन-तीन हुकमी संधी त्यांनी वाया घालविल्या. ६०व्या मिनिटाला कोरियाच्या क्विओन याने भारताच्या तीन खेळाडूंना चकवित गोल केला आणि या गोलाच्या आधारेच त्यांनी विजय मिळविला. त्यानंतर पाच मिनिटांनी भारतास पेनल्टी कॉर्नर मिळाला मात्र त्याचा फायदा घेण्यात रुपिंदरपाल सिंग अपयशी ठरला.