दोहा : पंचांच्या चुकीच्या निर्णयाने भारतीय फुटबॉल संघाची प्रथमच ‘फिफा’ विश्वचषक पात्रतेच्या तिसऱ्या फेरीत खेळण्याची संधी हिरावून घेतली. विश्वचषक पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत मंगळवारी रात्री झालेल्या कतारविरुद्धच्या सामन्यात भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे ‘फिफा’ विश्वचषकात खेळण्याचे भारतीय फुटबॉल संघाचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरेच राहिले.
माजी कर्णधार सुनील छेत्रीच्या निवृत्तीनंतर प्रथमच खेळताना भारतीय संघाने या सामन्याची उत्तम सुरुवात केली होती. ३७व्या मिनिटाला लाललिआनझुला छांगटेने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी भारतीय संघाने बराच वेळ टिकवली होती. मात्र, ७३व्या मिनिटाला पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा भारताला फटका बसला. युसूफ एमेनने गोल करत कतारला बरोबरी करून दिली. मात्र, त्याने चेंडू गोलजाळ्यात मारण्यापूर्वी, चेंडू गोलच्या शेजारील रेषेबाहेर गेल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे कतारने केलेला गोल अपात्र ठरवला जाणे अपेक्षित होते. परंतु पंच किंवा लाइन्समन (दोन्ही बाजूंच्या रेषेवर असणारे साहाय्यक पंच) यापैकी कोणीही चेंडू रेषेच्या बाहेर गेल्याची खूण केली नाही. त्यामुळे कतारचा गोल ग्राह्य धरण्यात आला. त्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या कतारच्या खेळाडूंनी भारताच्या बचावफळीवर दडपण आणले. अहमद अल-रावीने ८५व्या मिनिटाला गोल नोंदवताना कतारला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर भारताला पुनरागमन करणे शक्य झाले नाही आणि त्यांना विश्वचषक पात्रतेच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले.
हेही वाचा >>> IND vs USA : सौरभ नेत्रावळकरने रचला इतिहास! सॉफ्टवेअर इंजिनिअरने रोहित-विराटचा कोड केला क्रॅक, पाहा VIDEO
‘अ’ गटातील अन्य लढतीत ईद अल-रशिदीने केलेल्या गोलमुळे कुवेतने अफगाणिस्तानला १-० अशा फरकाने नमवले. त्यामुळे या गटातून कतार (१६ गुण) आणि कुवेत (७ गुण) या संघांनी विश्वचषक पात्रतेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. भारत आणि अफगाणिस्तान प्रत्येकी पाच गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिले.
भारताचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या सुनील छेत्रीने पाच दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील आपला अखेरचा सामना खेळला. त्यानंतर जागतिक क्रमवारीत १२१व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाकडून कतारविरुद्ध फारशा अपेक्षा केल्या जात नव्हत्या. परंतु प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांचे अचूक नियोजन आणि खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय संघाने अनुभवी कतार संघाला कडवी झुंज दिली. मात्र, अखेरीस त्यांच्या पदरी निराशाच पडली.
पंचांची चौकशी करण्याची ‘एआयएफएफ’ची मागणी
चेंडू गोलच्या शेजारील रेषेबाहेर जाऊनही, त्यानंतर कतारच्या खेळाडूने केलेला गोल ग्राह्य धरण्याच्या पंचांच्या निर्णयाची चौकशी करण्याची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) मागणी केली आहे. हा निर्णय अन्यायकारक असल्याचे ‘एआयएफएफ’चे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी म्हटले आहे. ‘‘हार आणि जीत, खेळाचा भागच आहे. तो स्वीकारणे आम्ही शिकलो आहे. मात्र, मंगळवारी रात्री झालेल्या सामन्यात भारताविरुद्ध करण्यात आलेल्या दोनपैकी एका गोलने बरेच प्रश्न निरुत्तरित सोडले आहेत. याबाबत आम्ही ‘फिफा’च्या विश्वचषक पात्रता फेरीचे प्रमुख, आशियाई फुटबॉल संघटनेच्या (एएफसी) पंचांचे प्रमुख आणि सामनाधिकारी यांना पत्र लिहिले आहे. या चुकीच्या निर्णयाने आमची विश्वचषक पात्रतेच्या तिसऱ्या फेरीत खेळण्याची संधी हिरावून घेतली. हे लक्षात घेता, आम्ही संबंधित पंचांच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच आमच्यावर झालेल्या अन्यायाची क्रीडा पातळीवर नुकसानभरपाई देण्याच्या शक्यतांचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे. ‘फिफा’ आणि ‘एएफसी’ योग्य पावले उचलतील असा आम्हाला विश्वास आहे,’’ असे ‘एआयएफएफ’च्या पत्रकात चौबे म्हणाले.