संदीप कदम, लोकसत्ता

अहमदाबाद : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघासमोर लय मिळवण्याचे आव्हान असून आज, बुधवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या ‘एलिमिनेटर’मध्ये त्यांची आत्मविश्वास दुणावलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुशी गाठ पडेल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ दुसऱ्या ‘क्वॉलिफायर’मध्ये प्रवेश मिळवणार असून पराभूत होणाऱ्या संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा ‘करो या मरो’चा सामना असणार आहे.

राजस्थानच्या संघाने यंदाच्या ‘आयपीएल’ची दमदार सुरुवात केली होती. राजस्थानचा संघ एकवेळ अव्वक दोन संघांमध्ये होता. मात्र, सलग चार पराभव आणि कोलकाताविरुद्धचा अखेरचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने राजस्थानची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. त्यामुळे आता अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांना सलग दोन विजय मिळवावे लागणार आहेत.

हेही वाचा >>>शेन वॉट्सनने RCB च्या खेळाडू अन् चाहत्यांची मागितली माफी, २०१६ च्या IPL फायनलबाबत मोठं वक्तव्य

दुसरीकडे, या हंगामाच्या मध्यात गुणतालिकेत तळाला असलेल्या बंगळूरुच्या संघाने दमदार पुनरागमन करताना गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले. सुरुवातीच्या आठपैकी सात सामन्यांत पराभूत झालेल्या बंगळूरुच्या संघाने पुढील सलग सहा सामने जिंकण्याचा पराक्रम केला. बंगळूरुने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला नमवत ‘प्ले-ऑफ’मधील आपले स्थान निश्चित केले. त्यामुळे आता त्यांना रोखण्याचे राजस्थानसमोर आव्हान असेल.

कोहली, ड्यूप्लेसिसकडून अपेक्षा

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुसाठी या हंगामात विराट कोहलीने १४ सामन्यांत ७०८ धावा केल्या आहेत. सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तोच अग्रस्थानी आहे. त्यामुळे त्याच्याकडून बंगळूरुला दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. कर्णधार फॅफ ड्यूप्लेसिसला लय सापडली आहे. रजत पाटीदारनेही पाच अर्धशतके झळकावताना बंगळूरुच्या यशात योगदान दिले आहे. दिनेश कार्तिकने १९५च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहे. गेल्या सामन्यात यश दयालने चेन्नई सुपर किंग्जच्या महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा या तारांकित फलंदाजांना रोखताना बंगळूरुला विजय मिळवून दिला होता. त्याच्यासह मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन यांच्यावर वेगवान गोलंदाजीची भिस्त असेल. ग्लेन मॅक्सवेलने कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे. त्याला आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यात यश आल्यास बंगळूरुला रोखणे प्रतिस्पर्धांना अवघड होईल.

सॅमसन, यशस्वी, परागवर मदार

‘आयपीएल’च्या पहिल्या हंगामातील विजेत्या राजस्थानच्या संघाला काही आठवड्यांपूर्वी जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, पूर्ण झालेल्या गेल्या चार सामन्यांतील पराभवांत त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीतील कच्चे दुवे समोर आले आहेत. जोस बटलर मायदेशी परतल्याचा राजस्थानच्या फलंदाजीवर परिणाम झाल्याचे जाणवते. आता यशस्वी जैस्वाल (३४८ धावा), कर्णधार संजू सॅमसन (५०४ धावा) आणि रियान पराग (५३१ धावा) यांच्यावर राजस्थानच्या फलंदाजीची मदार असेल. बटलरच्या अनुपस्थितीत इंग्लंडचा टॉम कोहलेर-कॅडमोर सलामीला येणे अपेक्षित आहे. राजस्थानकडे ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, रविचंद्रन अश्विन आणि यजुवेंद्र चहल यांसारखे चांगले गोलंदाज आहेत.

● वेळ : सायं. ७.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा अॅप