कुलदीप यादवनंतर अजून एका भारतीय क्रिकेटपटूने साखरपुडा केला आहे. कुलदीप यादवने कोणालाही न सांगता गुपचूप साखरपुडा उरकला. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर आज ८ जूनला रिंकू सिंहदेखील खासदार प्रिया सरोजबरोबर साखरपुडा करणार आहे. यादरम्यान अजून एका खेळाडूने साखरपुडा केल्याचे फोटो शेअर केले आहेत.
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा रविवार, ८ जून रोजी लखनौमध्ये होणार आहे. अनेक मोठ्या व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे, परंतु त्याआधी भारताच्या २६ वर्षीय फिरकीपटूने गुपचूप साखरपुडा उरकला.
लखनौ सुपर जायंट्स संघाचा स्टार स्पिनर एम. सिद्धार्थने ७ जून रोजी साध्विका नावाच्या मुलीशी साखरपुडा केला. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर त्याच्या साखरपुड्याचे फोटो अपलोड केले आहेत.
तामिळनाडूच्या या २६ वर्षीय खेळाडूने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. एम. सिद्धार्थने २०२४ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याला लखनौ सुपर जायंट्सने २.४० कोटी रुपयांना खरेदी केले होते. पण त्या हंगामात फक्त तीन सामने खेळू शकला. आयपीएल २०२५ मध्ये, लखनौ सुपर जायंट्सने त्याला पुन्हा ७५ लाख रुपयांना संघात समाविष्ट केले. या हंगामात, त्याने एलएसजीसाठी २ सामने खेळले. ज्यामध्ये त्याने २ विकेट्स घेतल्या. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये ५ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने तीन विकेट्स घेतल्या आहेत.
विराट कोहलीला केलं होतं बाद
एम. सिद्धार्थ हा डावखुरा ऑर्थोडॉक्स स्पिनर आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स (आरसीबी) बंगळुरूचा आणि भारताचा रनमशीन स्टार फलंदाज विराट कोहलीला बाद करून तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्या सामन्यात लखनौने आरसीबीचा २८ धावांनी पराभव केला. त्या सामन्यात विराट कोहली १६ चेंडूत २ चौकार आणि १ षटकारासह २२ धावा करत एम. सिद्धार्थच्या चेंडूवर बाद झाला.
एम. सिद्धार्थने देशांतर्गत क्रिकेट आणि तामिळनाडू प्रीमियर लीगमध्येही खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत ८ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २८ विकेट्स घेतल्या आहेत. तर लिस्ट-ए मध्ये त्याने ११ सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २४ देशांतर्गत टी-२० सामने खेळले आहेत ज्यात त्याने १८ विकेट्स घेतल्या आहेत.