पहिल्यावहिल्या हंगामापासून आयपीएलचा अविभाज्य हिस्सा असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं जेतेपदाचं स्वप्न १८व्या हंगामात प्रत्यक्षात साकारलं. संपूर्ण हंगामात दमदार आणि सातत्यपूर्ण खेळ हे आरसीबीच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. या विजयाचं गमक लिलावात त्यांनी घेतलेल्या अचूक निर्णयांमध्ये होतं असं म्हणावं लागेल. विराट कोहली हा आरसीबीचा कणा आहे. त्याच्या अनुषंगाने सम्यक संघ उभारणं आवश्यक होतं. आरसीबीने व्यवस्थापनाने आधीच्या हंगामात झालेल्या चुका टाळत लिलावात योग्य खेळाडूंची निवड केली आणि त्याचं फळ त्यांना जेतेपदाच्या रुपाने मिळालं.
लिलावात प्रत्येक संघाकडे १२० कोटी रुपये उपलब्ध होते. आरसीबीने ११९.२५ कोटी रुपये खर्चून उत्तम संघबांधणी केली. बंगळुरूचं एम. चिन्नास्वामी मैदान हा बंगळुरूचा बालेकिल्ला. छोट्या आकाराच्या या मैदानावर गोलंदाजांची कत्तल होते. त्यामुळे अचूक टप्प्यावर शिस्तबद्ध गोलंदाजी करणाऱ्या शिलेदारांची आरसीबीने निवड केली. ऑस्ट्रेलियाचा उंचपुऱ्या जोश हेझलवूडसाठी आरसीबीने १२.५ कोटी रुपये खर्चले. लिलावात हेझलवूडची बेस प्राईज २ कोटी होती. हेझलवूडला संघात घेण्यासाठी बहुतांश संघ आतूर होते. मात्र आरबीसीने हेझलवूड हेच प्राधान्य राखत त्याला ताफ्यात समाविष्ट केलं.
हेझलवूडच्या साथीला आरसीबीने भारताचा अनुभवी भुवनेश्वर कुमारला आपल्याकडे वळवलं. दोनवेळा परपल कॅपचा मानकरी ठरलेला भुवी टीम इंडियाच्या स्पर्धेतून अलीकडे बाजूला गेला आहे. आरसीबीने त्याच्या कौशल्यांची दखल घेत महत्त्वपूर्ण मोहरा समाविष्ट केला. २ कोटी बेस प्राईज असलेल्या भुवनेश्वरसाठी आरसीबीने १०.७५ कोटी रुपये मोजले. दिनेश कार्तिक निवृत्त झाल्यानंतर आरसीबीला एका दर्जेदार विकेटकीपर फलंदाजाची आवश्यकता होती. आरसीबीने याकरता अमरावतीच्या जितेश शर्माला हेरलं. विकेटकीपिंग कौशल्यांच्या बरोबरीने तडाखेबंद फटकेबाजीसाठी जितेश शर्मा ओळखला जातो. जितेश शर्माची बेस प्राईज २ कोटी होती. मात्र आरसीबीने या युवा शिलेदारासाठी ११ कोटी रुपये खर्चले.
सलामीवीर म्हणून आरसीबीने इंग्लंडच्या फिल सॉल्टला प्राधान्य दिलं. २ कोटी बेस प्राईज असलेल्या सॉल्टसाठी तब्बल ११.५ कोटी रुपये देत आरसीबीने तिजोरी रिती केली. फायनलमध्ये सॉल्टच्या खेळण्याबाबत साशंकता होती. कारण बाळाच्या जन्मासाठी सॉल्ट मायदेशी रवाना झाला होता. मात्र फायनलच्या दिवशी पहाटे ३ वाजता सॉल्ट अहमदाबादला पोहोचला. संध्याकाळी सामना खेळण्यासाठी उतरत सॉल्टने आपली निष्ठा सिद्ध केली. अष्टपैलू कृणाल पंड्याची उपयुक्तता आरसीबीने हेरली. टिच्चून गोलंदाजी करणारा कृणाल उत्तम फलंदाजी करतो आणि अतिशय चपळ क्षेत्ररक्षक आहे. कृणालसाठी आरसीबीने ५.५ कोटी रुपये द्यायचं ठरवलं.
संपूर्ण हंगामात लायम लिव्हिंगस्टोन लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही. पण त्याच्यासाठी आरसीबीने तब्बल ८.७५ कोटी रुपये खर्च केले. फायनलच्या महत्त्वपूर्ण लढतीत लिव्हिंगस्टोनने धोकादायक करू पाहणाऱ्या जोश इंगलिसचा झेल टिपला. टीम डेव्हिड दुखापतग्रस्त असल्याने लिव्हिंगस्टोनला संधी मिळाली. डेव्हिसने आधीच्या सामन्यांमध्ये छोट्या पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. आधीच्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या टीम डेव्हिडसाठी आरसीबीने ३ कोटी खर्च केले. कोलकातासाठी खेळणाऱ्या सुयश शर्माला आरसीबीने शिताफीने हेरलं आणि २.६ कोटी रुपये देऊन ताफ्यात समाविष्ट केलं. सुयशच्या हर्नियाची शस्त्रक्रिया आणि रिहॅबची आरसीबीने काळजी घेतली. हा विश्वास सार्थ ठरवत सुयशने दमदार कामगिरी केली. वेस्ट इंडिजचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू रोमारिओ शेफर्ड उपयुक्त ठरू शकतो हे आरसीबीने जाणलं आणि त्याला संघात घेतलं.
लिलावात जाण्यापूर्वी आरसीबीने केवळ तीनच खेळाडूंना रिटेन केलं. संघाचा आधारवड विराट कोहलीला रिटेन करणं साहजिक होतं. यासाठी आरसीबीने २१ कोटी रुपये खर्चले. कर्णधारपदाचा काटेरी मुकूट सांभाळणाऱ्या रजत पाटीदारला आरसीबीने रिटेन केलं. ११ कोटी रुपये खर्चून आरसीबीने रजतला आपल्याकडेच राखलं. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाळला रिटेन करत आरसीबीने अनेकांना चकित केलं. यशसाठी आरसीबीने ५ कोटी रुपये अदा केले.
जोश हेझलवूड २ कोटी- १२.५ कोटी
जितेश शर्मा १ कोटी- ११ कोटी
भुवनेश्वर कुमार २ कोटी- १०.७५ कोटी
फिल सॉल्ट २ कोटी- ११.५ कोटी
लायम लिव्हिंगस्टोन २ कोटी- ८.७५ कोटी
कृणाल पंड्या २ कोटी- ५.७५ कोटी
टीम डेव्हिड २ कोटी- ३ कोटी
सुयश शर्मा ३० लाख- २.६ कोटी
रोमारिओ शेफर्ड १.५ कोटी- १.५ कोटी
रिटेन
विराट कोहली २१ कोटी
रजत पाटीदार ११ कोटी
यश दयाळ ५ कोटी
रसिक धर ३० लाख- ६ कोटी
स्वप्नील सिंग ३० लाख- ५० लाख
नुवान तुषारा ७५ लाख- १.६ कोटी
मनोज भडागे ३० लाख- ३० लाख
जेकब बेथेल १.२५ कोटी- २.६ कोटी
देवदत्त पड्डीकल २ कोटी- २ कोटी
स्वस्तीक चिकारा ३० लाख- ३० लाख
लुंगी एन्गिडी १ कोटी- १ कोटी
अभिनंदन सिंग ३० लाख- ३० लाख
मोहित राठी ३० लाख- ३० लाख