मुंबई  : ‘आयपीएल’मध्ये आज, रविवारी अखेरचे साखळी सामने खेळवण्यात येणार असून ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या संघांमध्ये चुरस आहे. आज दुपारच्या सामन्यात मुंबईसमोर सनरायजर्स हैदराबादचे, तर सायंकाळी होणाऱ्या सामन्यात बंगळूरु समोर गुजरात टायटन्स संघाचे आव्हान असेल. या सामन्यांनंतर ‘प्ले-ऑफ’चे चित्र स्पष्ट होणार आहे.

मुंबई-हैदराबाद सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर, तर बंगळूरु-गुजरात सामना बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. या दोनही स्टेडियमच्या खेळपट्टय़ा फलंदाजीला अनुकूल मानल्या जातात. त्यामुळे या सामन्यांत मोठय़ा धावसंख्यांची अपेक्षा असून दोन्ही संघांच्या निव्वळ धावगतीवरही याचा परिणाम होऊ शकेल.

मुंबई आणि बंगळूरु या दोनही संघांचे १३ सामन्यांत १४ गुण आहेत. मात्र, बंगळूरुची (+०.१८०) निव्वळ धावगती मुंबईच्या (-०.१२८) तुलनेत सरस आहे. परिणामी गुणतालिकेत बंगळूरुचा संघ चौथ्या, तर मुंबईचा संघ सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे मुंबईला हैदराबादविरुद्ध मोठय़ा विजयाची आवश्यकता आहे. हैदराबादचा संघ ‘प्ले-ऑफ’च्या शर्यतीतून आधीच बाद झाला असून आता मुंबईचा धक्का देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

दुसरीकडे, गुजरातचे गुणतालिकेतील अग्रस्थान निश्चित असल्याने ते बंगळूरुविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार हार्दिक पंडय़ा आणि मोहम्मद शमी यांसारख्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊ शकतील. ही बाब बंगळूरुच्या पथ्यावर पडू शकेल.

मुंबईने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सहापैकी चार सामन्यांत विजय नोंदवले आहेत. या विजयांमध्ये सूर्यकुमार यादवने निर्णायक भूमिका बजावली आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही मुंबईची भिस्त सूर्यकुमार, कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन या आघाडीच्या फलंदाजांवर असेल. अखेरच्या षटकांत कॅमरुन ग्रीन आणि टीम डेव्हिड यांनी फटकेबाजी करणे आवश्यक आहे. 

गुजरात व  बंगळूरु यांच्यातील सामना चुरशीचा होणे अपेक्षित आहे. बंगळूरुचे सलामीवीर विराट कोहली व  कर्णधार फॅफ डय़ूप्लेसिस यांनी यंदाच्या हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कोहलीने गेल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध शतक साकारले, तर यंदाच्या हंगामात ७०० धावांचा टप्पा ओलांडणारा डय़ूप्लेसिस एकमेव फलंदाज आहे. गोलंदाजीत मोहम्मद सिराजची भूमिका बंगळूरुसाठी निर्णायक ठरेल.

* मुंबई वि. हैदराबाद : वेळ : दुपारी ३.३० वा.

* बंगळूरु वि. गुजरात : वेळ : सायं. ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, जिओ सिनेमा