आयपीएल २०२४ च्या वेळापत्रकातील दोन सामन्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता आयपीएलने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. १६ आणि १७ एप्रिलला होणाऱ्या दोन सामन्यांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. कोलकाता नाईट रायडर्स वि राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स वि दिल्ली कॅपिटल्स या संघाचे सामने यादिवशी होणार आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स वि राजस्थान रॉयल्सचा सामना मूळ वेळापत्रकाप्रमाणे पूर्वी १७ एप्रिल २०२४ ला ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता येथे होणार होता. पण आता हा सामना १७ ऐवजी १६ एप्रिलला खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या ठिकाणामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

तर गुजरात टायटन्स वि दिल्ली कॅपिटल्स हा दुसरा पूर्वनियोजित सामना १६ एप्रिलला खेळवला जाणार होता, त्यात बदल करून आता हा सामना १७ एप्रिल रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळवला जाईल. दोन्ही संघांच्या सामन्यांच्या तारखांमध्ये हा बदल करण्यात आला आहे.

आयपीएलच्या वेळापत्रकात अचानक बदल का करण्यात आला?

आयपीएलने अचानक वेळापत्रकात बदल का केला, याचे कारण म्हणजे रामनवमीचा सण. १७ एप्रिल रोजी कोलकातामध्ये कोलकाता नाईट रायडर्स वि राजस्थान रॉयल्स हा सामना होता आणि त्याच दिवशी रामनवमी आहे. कोलकाता शहरात या सणाला वेगळे महत्त्व असून त्या दिवशी सुरक्षेचा मुद्दा निर्माण झाला असता. याच कारणामुळे हा सामना एक दिवस अगोदर आयोजित करण्यात आला होता. सोमवारी आयपीएल फ्रँचायझी, बीसीसीआय आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी कोलकाता पोलिसांच्या संपर्कात असल्याचे वृत्त समोर आले होते. या दोन सामन्यांशिवाय अन्य कोणत्याही सामन्यांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. उर्वरित सर्व सामने त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार खेळवले जातील.