Indian Premier League 2025 Opening Ceremony Details: आयपीएल २०२५ हंगाम अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. सलामीची लढत इडन गार्डन्स, कोलकाता इथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यजमान कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. क्रिकेटविश्वातले सगळे प्रमुख खेळाडू या बहुचर्चित स्पर्धेसाठी भारतात दाखल झाले आहेत. लिलावानंतर संघांची रचना बदलली आहे. नवा हंगाम, नवे भिडू असं प्रत्येक संघासाठी समीकरण आहे. दोन महिने चालणार असलेल्या या स्पर्धेची अंतिम लढत २५ मे रोजी होणार आहे. दहा संघांमध्ये जेतेपदासाठी प्रचंड चुरस पाहायला मिळणार आहे.

तारांकित अशा उद्घाटन सोहळ्यात अभिनेत्री दिशा पटानी, नामवंत गायिका श्रेया घोषाल, करण औलिजा हे आपली कला सादर करणार आहेत. कार्यक्रमानंतर सलामीची लढत सुरू होईल. गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात जेतेपदावर नाव कोरलं होतं.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांनी प्रत्येकी ५ वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. लिलावानंतर प्रत्येक संघात घाऊक बदल झाले आहेत. पाच संघांचे कर्णधार बदलले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व आता अजिंक्य रहाणे करणार आहे. श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचा कर्णधार असणार आहे. दिल्लीने अक्षर पटेलला कर्णधारपदी नियुक्त केलं आहे.

आयपीएल उद्घाटन सोहळ्याचे तपशील जाणून घेऊया

सोहळा कधी होणार?
२२ मार्च, शनिवारी आयपीएल उद्घाटन सोहळा रंगणार आहे.

सोहळा कुठे होणार?
एक लाख क्षमतेच्या इडन गार्डन्स या ऐतिहासिक मैदानावर हा सोहळा आणि त्यानंतर सलामीची लढत रंगणार आहे.

उद्घाटन सोहळा किती वाजता सुरू होणार?
शनिवारी संध्याकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा सुरू होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्घाटन सोहळा कोणत्या चॅनलवर पाहता येईल?
स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर चाहत्यांना हा सोहळा पाहता येईल.

ऑनलाईन हा सोहळा पाहता येईल का?
जिओ सिनेमा आणि हॉटस्टार या ठिकाणी तुम्हाला आयपीएल उद्घाटन सोहळा पाहता येईल.

आयपीएल उद्घाटन सोहळ्यात कोणते कलाकार सहभागी होणार आहेत?
असंख्य तारेतारका या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यामध्ये अभिनेत्री दिशा पटानी, गायिका श्रेया घोषाल, पंजाबी गायिका करण औलिजा हे सहभागी होणार आहेत.